दंंगलींमुळे कुणाचा फायदा हे तर जगजाहीर; जयंत पाटलांचा निशाणा नेमका कुणावर?
Jayant Patil replies Pravin Darekar : राज्यात मागील काही दिवसांपासून तणावाच्या घडत आहेत. नगर आणि कोल्हापूरमध्ये घडलेल्या घटनांवरून राजकारण तापले आहे. सत्ताधारी विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. विधानपरिषदेतील भाजप आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
पाटील म्हणाले, पवार साहेबांनी कायम अशा अनिष्ट प्रवृत्तींना लवकर आळा घालावा अशी मागणी केली आहे. या राज्यात दंगली घडवल्या तर कुणाचा फायदा होतो हे सगळयांना जगजाहीर आहे. राज्यात आपली लोकप्रियता कमी झाली आहे ती सावरण्यासाठी काही लोकं असा प्रयत्न करत असतील पण पवार साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस किंवा कॉंग्रेस हे कधीही अशा पद्धतीच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करणारे नाहीत याची महाराष्ट्रातील लोकांना खात्री आहे. त्यामुळे प्रविण दरेकर यांना काय बोलायचे ते बोलू द्या महाराष्ट्रातील जनतेला सगळे काही माहिती आहे, असा टोला पाटील यांनी लगावला.
महाराष्ट्रात काही लोकांची लोकप्रियता खाली गेली आहे ती पुन्हा मिळविण्यासाठी बाकीच्या सगळ्या गोष्टी, मार्ग, पर्याय संपलेले दिसत आहेत म्हणून या शेवटच्या पर्यायाकडे ही लोकं पावले टाकायला लागली आहेत, असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.
Champions Trophy 2025: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला मोठा धक्का, चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद जाणार
मागच्या महिन्यापूर्वी काही लोकांनी दंगली घडवल्या जातील असे दिसायला लागले आहे असे वक्तव्य केले होते आणि आता हळुहळु त्याचा प्रत्यय काही महिन्यात यायला लागला आहे असे सांगतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री या नात्याने जबाबदारीने सर्वांमध्ये शांतता राहील अशा पद्धतीनेच पावलं उचलली पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्रात दंगल होणार नाही. दोन समाजात तणाव निर्माण होणार नाही याची काळजी ते घेतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
धमकीकडे दुर्लक्ष नको, कठोर कारवाई करा
आज खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः वडिलांना धमकी आली म्हणून मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन तक्रार दाखल केली. एव्हाना त्या व्यक्तीला अटक व्हायला हवी होती. पण तसं होणार नाही. कारण अप्रत्यक्षरीत्या अशा गोष्टींचे समर्थन करणारे लोकं आज त्यांना अटक करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही असं आम्हाला दिसते. लवकरात लवकर त्या व्यक्तीला आणि त्यासोबत असलेला जो ग्रुप आहे. नेहमी चॅट करणारे त्यांचे चॅट तपासले पाहिजे. फोनवर काय चालते हे तपासले पाहिजे अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. तो भाजप कार्यकर्ता आहे असं तो म्हणतोय. द्वेषाचे राजकारण देशात निर्माण झाले पाहिजे असा प्रयत्न देशात व महाराष्ट्रात सुरू आहे. महाराष्ट्र नेहमीच पुरोगामी विचारांना पाठिंबा देणारा आहे. महाराष्ट्र इतर राज्यांपेक्षा जास्त सुजाण आहे. जाणीवपूर्वक हे चाळे कोण करतंय हे महाराष्ट्राला हळूहळू कळायला लागले आहे असेही पाटील म्हणाले.
निलेश राणेंना दोष देण्याची गरज नाही
निलेश राणे याने एवढे गंभीर विधान केले आहे. याबाबतीत त्यांना दोष देण्याची गरज नाही कारण त्याचे बोलवते धनी वेगळे आहेत. बोलवते धनी सत्तेत बसल्यामुळे अशा प्रवृत्तींना जोर फुटायला लागला आहे. महाविकास आघाडी सत्तेवर येण्याची दिशा दाखवण्याचे काम पवार साहेब करू शकतात. त्यांच्याबद्दल टोकाच्या भाषा वापरणे टीका करणे व स्वतः प्रसिद्धी मिळवणे आणि ज्यांना ते प्रोत्साहन देत आहेत त्यांना प्रोत्साहन देत खूश करण्याचे काम आज चालू आहे असा अप्रत्यक्ष टोलाही जयंत पाटील यांनी भाजपला लगावला.