क्रांतिकारी निर्णयाच्या दिशेनं नार्वेकरांचं पाऊल; शिंदे-ठाकरेंच्या 55 आमदारांची धाकधूक वाढली

क्रांतिकारी निर्णयाच्या दिशेनं नार्वेकरांचं पाऊल; शिंदे-ठाकरेंच्या 55 आमदारांची धाकधूक वाढली

मुंबई : शिवसेना आणि शिवसेना (UBT) गटाच्या 55 आमदारांची धाकधूक वाढली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अपात्रतेसंदर्भात शिवसेनेच्या 40 आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) 14 आमदारांना नोटीस बजावली आहे. दोन्ही बाजूच्या आमदारांना नोटीसाला उत्तर देण्यासाठी 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. उत्तर देताना अपात्रतेविरोधातील कारवाई टाळण्यासाठी आमदारांना सर्व पुरावे सादर करावे लागणार आहेत. (Maharashtra Speaker Rahul Narvekar issues notices to MLAs of both factions of Shiv Sena to give their reply on the issue of disqualification)

दरम्यान,  निवडणूक आयोगाकडून विधीमंडळ सचिवालयाला शिवसेनेच्या घटनेची प्रत प्राप्त झालेली आहे. त्यानुसार या आमदारांच्या उत्तरानंतर या घटनेचा अभ्यास करून निर्णय घेण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या शिवसेना प्रकरणात आणि मणिपूर विधानसभा अध्यक्षांच्या प्रकरणातील निकालानुसार तीन महिन्यांच्या आत म्हणजे 10 ऑगस्टपूर्वी अपात्रेच्या याचिकांसदर्भात निर्णय घेणं राहुल नार्वेकर यांना बंधनकारक आहे.

सुनील प्रभू यांची याचिका :

जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारलं होतं. त्यानंतर पक्षाच्या बैठकीत उपस्थित न राहणाऱ्या 16 आमदारांच्या विरोधात तत्कालिन प्रतोद सुनिल प्रभू यांनी अपात्रतेची याचिका दाखल केली होती. या 16 आमदारांमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे हे मंत्री तर प्रकाश सुर्वे, महेश शिंदे, भरत गोगावले, संजय शिरसाट, यामिनी जाधव, लता सोनवणे, रमेश बोरनाळे, संजय रायमुलकर, चिमणराव पाटील, बालाजी किणीकर आणि बालाजी कल्याणकर हे आमदार आहेत.

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी या आमदारांना नोटीस बजावली होती. मात्र त्यावर उत्तर देण्यासाठीची मुदत कमी असल्याचा दावा करत शिंदे यांच्यासह या 16 आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर जवळपास एक वर्ष चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे वर्ग केलं. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या 40 आणि 15 अशा दोन्ही बाजूच्या 55 आमदारांना नोटीस बजावली आहे.

क्रांतिकारी निर्णय घेणार :

काही दिवसांपूर्वी दिवंगत बाळासाहेब देसाई यांच्या दौलत या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना राहुल नार्वेकर यांनी मोठं विधान केलं होतं. बाळासाहेब देसाई यांनी 1977-78 मध्ये विधानसभा अध्यक्ष म्हणून काम केलं. देसाई यांनी ज्या प्रमाणे क्रांतिकारी निर्णय घेतले होते. त्यातून काही तरी शिकून मी देखील लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन, असं राहुल नार्वेकर म्हणाले होते. त्यानंतर आता या आमदारांना नोटीस बजावत क्रांतिकारी निर्णय घेण्याच्या दिशेने नार्वेकर यांंनी पहिलं पाऊल टाकलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube