Radhakrushn Vikhe Patil : महाविकास आघाडीने भविष्य सांगण्याचा धंदा सुरू केलाय
अहमदनगर : महाविकास आघाडीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात भविष्यकार तयार झाले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सध्या कोणतेही काम राहीलेले नाही. त्यामुळेच भविष्य सांगण्याचा धंदा त्यांनी सुरू केला आहे. पोपटपंची करणाऱ्या भविष्यकारांकडून जेवढ्या तारखा सांगितल्या जातील तेवढा सरकारचा कालावधी अधिक मजबूतीने वाढत जाणार असल्याचा विश्वास महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
अहमदनगर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. उत्तर महाराष्ट्राचे संघटन मंत्री रवीजी अनासपुरे आमदार बबनराव पाचपुते, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे, राजेंद्र गोंदकर, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, शहराचे अध्यक्ष भैय्या गंधे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, यांच्यासह सर्व शहर तालुक्यांचे अध्यक्ष सरचिटणीस विविध आघाड्यांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली. सरकारच्या संदर्भात त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या वक्तव्यांची किव येते. महाविकास आघाडीच्या नेत्यांना सध्या कोणतेही काम राहीलेले नाही. त्यामुळेच भविष्य सांगण्याचा धंदा त्यांनी सुरू केला असलातरी त्यांची पोपटपंची वायफळ आणि तथ्यहीन असल्याची टिका करून ते जेवढ्या तारखा जाहीर करतील तेवढा शिंदे फडणवीस सरकारचा कालावधी अधिक मजबूतीने वाढणार असल्याचा टोला त्यांनी लगावला.
यापुर्वी राज्यातील जनतेने भाजप शिवसेनेला सता स्थापनेचा कौल दिला होता. परंतू जनतेशी गद्दारी करून शिवसेने महाभकास आघाडी निर्माण केली होती. विचारांशी प्रतारणा झाल्यानेच एकनाथ शिंदे यांच्यासह आमदार आणि खासदार बाहेर पडले. त्यांनाच निवडणूक आयोगाने आता बाळासाहेबांची शिवसेना म्हणून मान्यता दिली. असल्याकडे लक्ष वेधून मंत्री विखे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या काळात वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे होणारे अनावरण हा महाराष्ट्रातील प्रत्येक माणसासाठी अभिमानाचा क्षण आहे. परंतू त्या कार्यक्रमाबाबत ठाकरे गटाला दुर्बुध्दी सूचत असल्याची टीका त्यांनी केली.
नाशिक पदवीधर निवडणुकीबाबत पक्ष नेतृत्व जो निर्णय करून आदेश देतील. त्या उमेदवाराचे काम पदाधिकारी आणि कार्यकर्ते करतील एवढेच सांगत करून कॉंग्रेस पक्षात सत्यजीत तांबेंवर खरच अन्याय झाला असेल तर तो त्यांनी जाहीरपणे मांडण्याचा सल्ला मंत्री विखे पाटील यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिला.