जरांगेंची तब्येत ढासाळताच… वर्षा बंगल्यावर CM फडणवीसांसोबत महाजन-विखेंची मध्यरात्री बैठक, राजकीय हालचालींना वेग

Meeting At Devendra Fadnavis Varsha Bunglow : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी आझाद मैदानावर सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे (Manoj Jaragne Patil) उपोषण तिसऱ्या दिवशी गंभीर वळणावर पोहोचले आहे. मध्यरात्री त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने डॉक्टरांना तातडीने तपासणीसाठी बोलावावे लागले. तर दुसरीकडे, रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या वर्षा बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग आलाय. मंत्री गिरीश महाजन आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची मुख्यमंत्र्यांसोबत तब्बल तासभर बैठक (Varsha Bunglow) झाली. नंतर हे दोन्ही नेते गुपचूप बाहेर पडल्याने आगामी घडामोडींवर सर्वांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.
प्रकृती चिंताजनक
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे आणि ते देताना सगेसोयऱ्यांचा निकष लावावा, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या उपोषणाला आज तिसरा दिवस सुरू झाला असून, दोन दिवसांपासून अन्नपाणी न घेतल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होऊ लागली आहे. शनिवारी मध्यरात्री त्यांना अस्वस्थता जाणवली. त्यामुळे तातडीने डॉक्टरांना बोलावून त्यांची तपासणी करण्यात आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, उपोषण आणखी लांबले तर त्रास होऊ शकतो. त्यामुळे आता राज्य सरकारची भूमिका काय राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महिन्याच्या अखेरीस धनलाभाची संधी! ‘या’ राशींवर होणार माता लक्ष्मीची कृपा
सरकारकडून हालचाली सुरू होण्याची शक्यता
शनिवारी दिवसभरात मराठा उपसमितीची बैठक पार पडली. त्यानंतर न्यायमूर्ती शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मात्र, जरांगे यांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहण्याचा पवित्रा कायम ठेवला. रात्री उशिरा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गेले होते. तिन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर सविस्तर चर्चा झाली. चर्चेनंतर मात्र हे दोन्ही नेते कोणताही अधिकृत प्रतिसाद न देता गुपचूप वर्षा बंगला सोडून निघून गेले.
ब्रेकिंग! मनोज जरांगेंची तब्येत बिघडली, मध्यरात्री डॉक्टरांकडून तपासणी
आज पुन्हा महत्त्वाची बैठक
मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी शनिवारी रात्रीच मुख्यमंत्र्यांना शिंदे समिती आणि जरांगे यांच्यात झालेल्या चर्चेची सविस्तर माहिती दिली. त्याचबरोबर उपसमितीच्या दोन स्वतंत्र बैठकीत झालेल्या चर्चेचाही आढावा मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला. या घडामोडींनंतर आज सकाळी दहा वाजता पुन्हा एकदा मंत्रिमंडळातील मराठा उपसमितीची बैठक होणार आहे. यातून पुढील तोडगा निघतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आझाद मैदानात मराठा बांधवांची गर्दी
दरम्यान, उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आझाद मैदानात आंदोलकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. राज्यभरातून मराठा बांधव मुंबईत दाखल होत असून, आंदोलकांच्या खाण्यापिण्याची जबाबदारी देखील समाजातील लोकांनी स्वीकारली आहे. सकाळी महापालिकेच्या कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात नाश्त्याचे वाटप करण्यात आले. केळी, सफरचंदे, तसेच इतर खाद्यपदार्थांची वाहतूक करणारे टेम्पो मैदानात पोहोचत आहेत. यामुळे आंदोलन अधिक ठाम व संघटित पद्धतीने सुरू राहण्याची चिन्हे दिसत आहेत.