क्लिप ऐकवल्यानंतर जरांगे संतापले! “फडणवीस साहेब, क्लिपमधील लोकांचा तुम्ही शोध घ्या, नाहीतर यात तुमचा हात आहे, असं समजू”

Manoj Jarange Audio Clip; जरांगेंनी 500 कोटींच्या आरोपांवरून कथित ऑडिओ क्लिप ऐकवत देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींकडे चौकशीची मागणी केली.

Manoj Jarange Audio Clip

Manoj Jarange Audio Clip: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 500 कोटी रुपयांवरून केलेल्या आरोपांनंतर आता कथित ऑडिओ क्लिप ऐकवली आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला 500 कोटी रुपये दिल्याची चर्चा भाजपमध्ये सुरू असल्याचा दावा जरांगे यांनी यापूर्वी केला होता. त्यावर एकनाथ शिंदे यांनी आरोप फेटाळत पुरावे सादर करण्याचं आव्हान दिलं होतं. त्यानंतर आज पत्रकार परिषद घेत जरांगे यांनी कथित ऑडिओ क्लिप ऐकवली आणि गेल्या तीन वर्षांपासून आपल्याविरोधात षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप केला.

पडळकर यांचा बळीचा बकरा करायचा प्लॅन ठरला.. सांगलीतल्या नेत्यांनी डाव टाकलाच

‘तीन वर्षांपासून माझ्याविरोधात षडयंत्र’

पत्रकार परिषदेत बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, “सलग तीन वर्षापासून आजपर्यंत सारखं माझ्या विरोधात षड्यंत्र सुरू आहे. हे षडयंत्र माझ्या मायबाप समाजापुढे जायला पाहिजे. हे किती मोठे हे प्रकरण आहे, मी किती वेदना सहन करत आलो आहे, हे मराठा समाजापुढे गेलं पाहिजे. मराठ्यांचा आंदोलन अन्याय करून बंद पडायचं, जाणून बुजून मराठ्यांना त्रास द्यायचा. कसे षडयंत्र रचले जात आहे, हे मराठा समाजापुढे येणार आहे.”

निवडणूक, उपोषण आणि आंदोलनाच्या काळातही आपल्याविरोधात षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तपास करावा, अशी मागणीही जरांगे यांनी केली.

कथित ऑडिओ क्लिपमध्ये निरंजन डावखरे, दरेकर यांच्या नावांचा उल्लेख

जरांगे यांनी ऐकवलेल्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये निरंजन डावखरे आणि दरेकर यांच्या नावांचा उल्लेख असल्याचं सांगितलं जात आहे. जरांगे यांच्या विरोधात बोलण्यासाठी काही लोकांना पुढे आणण्याबाबत तसेच त्यांची प्रतिमा खराब करण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत संभाषण झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक रंगणार! 21 पैकी 9 जागा बिनविरोध, उर्वरित 12 जागांसाठी तिरंगी लढत

या कथित संभाषणात भाजपमधून जरांगे यांच्याविरोधात बोलण्यासाठी कोणी तयार नसल्याचा उल्लेख आहे. शरद पवार पैसे देत असल्याचा आरोप केवळ करून थांबण्याऐवजी जरांगे यांच्या विरोधात वातावरण तयार करण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींना पुढे आणण्याबाबत चर्चा असल्याचंही सांगितलं जात आहे.

तसंच, जरांगे यांच्याविरोधात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी पक्षाचा निधी वापरण्याचा उल्लेख या संभाषणात असल्याचा दावा आहे.

दुसऱ्या कथित क्लिपमध्ये 500 कोटींचा उल्लेख

जरांगे यांनी आणखी एक कथित ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपमध्ये एका महिलेच्या आवाजात जरांगे यांच्यापर्यंत 500 कोटी रुपये पोहोचल्याचा दावा ऐकू येत असल्याचं सांगितलं जात आहे.

क्लिपमधील कथित संभाषणात म्हटलं आहे की, जरांगे पाटील यांना 500 कोटी रुपये मिळाले असून, हे पैसे श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीत जरांगे यांची भूमिका भाजपच्या फायद्याची ठरेल की नाही, याबाबतही संभाषणात वेगळं मत व्यक्त करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.

रणबीर कपूरही होता बिश्नोई गँगच्या निशाण्यावर; घराची रेकी केल्याची माहिती

याशिवाय, देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करणे, त्यांची प्रतिमा खराब करणे, मराठा समाजाचं ओबीसीकरण आणि ‘व्होट जिहाद’ यांसारख्या मुद्द्यांवर प्रचार करण्याबाबत चर्चा झाल्याचा दावा जरांगे यांनी केला. संभाजीनगरमधील कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणाचा तसेच महाराष्ट्रात अमेरिकेतील लोक फिरत असल्याचा आणि बांगलादेशसंदर्भातील प्रचाराचा उल्लेखही या क्लिपमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र, या कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाची सत्यता, वक्त्यांची ओळख आणि त्यातील दाव्यांची स्वतंत्र पडताळणी झालेली असल्याची माहिती उपलब्ध नाही.

‘फडणवीस साहेब, तुम्ही शोधलं नाही तर यात तुमचा हात आहे असं समजू’

कथित ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. ऑडिओ क्लिपमध्ये बोलणारे लोकं कोण आहेत, याचा शोध फडणवीसांनी घ्यावा, असे जरांगे म्हणाले.

जरांगे म्हणाले, “हे लोक कोण आहेत देवेंद्र फडणवीस शिंदे यांनी शोधावे, सत्तेत तुम्ही आहेत शोधण्याचे काम तुमचे आहे. आम्ही सत्य जनते समोर ठेवले आहे. हे पक्षाचे नेटवर्क ठरवणारे, हे लोक देशाची आणि राज्याची रणनीती ठरवणारे लोक आहेत, एवढे षडयंत्र म्हटल्यावर आम्ही घराबाहेर कसे पडायचे, 3 वर्षापासून हे षडयंत्र सुरू आहे.”

बिनविरोधच्या बैठकांत एकीचा मुखवटा; थोरात-विखे एकत्र, तर शिंदे-लंकेंची स्वतंत्र रणनीती

पुढे त्यांनी म्हटलं, “तुमच्यापुढे सत्य मांडण्यासाठी ते उद्या आम्हाला मारून टाकतील, आम्ही सावध राहू, श्रीकांत भैय्याने 500 करोड दिले उल्लेख आहे. हे शिंदे साहेब म्हटल्याशिवाय ते बोलले का? फडणवीस साहेब तुम्ही शोधले नाही तर यात तुमचा हात आहे असे समजू, या लोकांना काळ्या पाण्याच्या शिक्षेपर्यंत न्या. मोदी साहेबांनी याचा छडा लावावा.”

तसंच, मराठा समाजातील लोकांना आपल्याविरोधात बोलण्यासाठी तयार केलं जात असल्याचा आरोप करत जरांगे यांनी मराठा समाजाला सावध राहण्याचं आवाहन केलं. “मराठ्यांच्या विरोधात मराठ्यांची पोर बोलायला तयार आहेत, मराठ्यांनी डोळे उघडा, निरंजन डावखरे मध्येच आला कोण आहे काय माहिती? भाजपचा पार्टी फंड वापरा असं त्यात सांगतात, माझ्या विरोधात भाजपचा फंड वापरत आहेत, माझ्या विरोधातील लोकांसाठी पार्टी फंड वापरत आहेत,” असंही ते म्हणाले.

‘माझ्याकडे आणखी काही आहे’; शिंदेंना इशारा

या प्रकरणात आपल्याकडे आणखी माहिती असल्याचा दावा करत मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांना इशाराही दिला. ते म्हणाले, “माझ्याकडे आणखी काही आहे. तुमचे पाय सुद्धा जमिनीवर थांबणार नाहीत. शिंदे साहेब तुम्ही कोणाविरोधात व्हाट्सअप कॉल वर बोललात. ते सुद्धा माहिती, शिंदे साहेब माझ्या विरोधात तुमची लोक बोलणे बंद करा, नाहीतर 2- 3 महिन्यांनी आणखी एक काढणार, शिंदे साहेब तुमचा स्वाभिमान होता तुम्ही माझ्या विरोधात टीम फिरवू नका.”

राज ठाकरे यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल, पुढील काही महिन्यांत देशात मोठ्या घडामोडींचे भाकीत

पुढे त्यांनी मंत्र्यांच्या नावांचा उल्लेख करत म्हटलं, “तुमचा कोणता मंत्री काय पुरवतो हे मला माहिती आहे. आमच्यावर खोटे गुन्हे कसे होतात हे सुद्धा आम्हाला माहिती आहे, बीडमध्ये लोकांवर गुन्हे दाखल करत आहेत. शिंदे साहेब तुम्ही सावध व्हा. फडणवीस साहेब मी खोलात गेलो तर माझ्याकडे भयंकर गोष्टी आहेत. तुम्ही थांबले नाही तर मी सगळे उघडे करणार, शिंदे साहेब हाताखाली धरलेल्या लोकांमुळे तुमचे करिअर उध्वस्त होईल.”

या संदर्भात सरनाईक, उदय सामंत, चिवटे, सत्तार, सुहास कांदे, दादा भुसे आणि केसरकर यांना सांगितल्याचंही जरांगे यांनी म्हटलं. नारायण गडाचा निधी कोणी रोखला, याची माहिती आपल्याला असल्याचा दावाही त्यांनी केला.

आरोपांची पडताळणी महत्त्वाची

मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत ऐकवलेल्या कथित ऑडिओ क्लिपच्या आधारे गंभीर आरोप केले आहेत. यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी 500 कोटी रुपयांच्या व्यवहाराचा आरोप फेटाळून लावत, जरांगे यांनी पुरावे द्यावेत आणि प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी भूमिका मांडली होती. आता जरांगे यांनी सादर केलेल्या कथित रेकॉर्डिंगची सत्यता, त्यातील आवाजांची ओळख आणि संभाषणाचा संपूर्ण संदर्भ तपासातून स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे. या नव्या आरोपांवर संबंधित नेत्यांची अधिकृत प्रतिक्रिया आणि पुढील चौकशीतून काय समोर येतं, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

follow us