मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा भाजपला फटका? म्हणून होतेय टीका…

  • Written By: Published:
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा भाजपला फटका? म्हणून होतेय टीका…

Manoj Jarange Vs Devendra Fadnavis मराठा आरक्षणाच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील हे आता थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना आव्हान देऊ लागले आहेत. भाजप देखील आता त्यामुळे सावध झाला आहे. वरवर पाहता हा वाद जरांगे पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा दिसत आहे. प्रत्यक्षात जरांगे हे भाजपच्या विरोधात खेळ्या करत असल्याचा संशय भाजपला येऊ लागला आहे.

या आंदोलनाचा भाजपला फटका बसतो आहे का? मराठा समाजाच्या भावनांचा वापर करून भाजपच्या विरोधात जनमत तयार करण्याचा हा प्रयत्न आहे का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करून जरांगे पाटील हे भाजप विरोधातील हवा पेटवत आहेत? असे सारे प्रश्न यातून निर्माण होत आहेत. याचा आढावा आपण यात घेणार आहोत.

मराठा आंदोलनात फडणवीस बॅकफूटवर

जरांगे पाटलांनी मराठवाड्यातील मराठ्यांकडे कुणबींची नोंद असेल तर त्यांना आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी मागणी सुरवातीला केली होती. त्यांच्या पहिल्या उपोषणाच्या ठिकाणी लाठीमार झाल्यानंतर हे आंदोलन राज्यभर पेटले. त्यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे नेते लगेचच तेथे गेले. भाजपने खासदार उदयनराजे यांना तेथे पाठवले. फडणवीस यांनी तेथे जाण्याचे टाळले. त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीने हे उपोषण सुटले. सरकारला २४ ऑक्टोबर २०२३ ची मुदत देऊन जरांगेंनी आंदोलन स्थगित केले. या आंदोलनावर लाठीमार झाल्याने गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे अडचणीत आले. सोशल मिडियावर ते ट्रोल झाले. त्यानंतर फडणवीस यांनी नंतर लाठीमाराबद्दल माफी मागितली. जरांगे हे तोपर्यंत फडणवीस यांच्याविरोधात बोलले नाहीत. पोलिसांच्या लाठीमाराबद्दलही त्यांनी गृहमंत्री म्हणून फडणवीस यांच्यावर थेट टीका केली नाही.

फडणवीस काड्या करत राहिले तर आम्ही डाव उधळणार; जरांगेंनी डायरेक्ट धमकावलंच

जरांगे पाटलांच्या दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनात हिंचाचाराचा भडका उडाला. बीड, जालना याठिकाणी जाळपोळ झाली. साहजिकच पोलिसांनी इंटरनेट बंद केले. हिंसाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. त्यावरून मग जरांगे यांनी दुसऱ्या उपोषणाच्या वेळी फडणवीस यांना प्रथमतः टार्गेट केले. राज्यातील एका उपमुख्यमंत्र्याला काड्या करायची सवय, असे म्हणून जरांगेंनी आपला राग व्यक्त केला होता.

या दरम्यान सरकारने निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमून कुणबी दाखले शोधण्याची मोहीम सुरू केली. मराठवाड्यातील आकडे पुढे आल्यानंतर जरांगे पाटलांनी आता संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना कुणबी ठरवून त्यांनी ओबीसीमध्ये घेण्याची मागणी केली. त्याचवेळी भाजपचे नेते सावध झाले. जरांगे यांच्या मागणीमुळे ओबीसींवर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली. भाजपने विदर्भात ओबीसी मेळावा घेतला. त्यात फडणवीस यांनी भाजपचा डीएनए हा ओबीसी असल्याचे स्पष्टपणे सांगितले. दुसरीकडे छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली सर्पपक्षीय ओबीसी नेते एकत्र येऊ लागले. जालन्यातील पहिल्या सभेला भाजपने पंकजा मुंडेसारख्या मोठ्या नेत्यांना पाठविण्याचे टाळले. त्याऐवजी देवयानी फरांदे, गोपीचंद पडळकर, आशिष देशमुख आदी नेते त्या मेळाव्यात गेले.  दुसऱ्या फळीतील नेते पाठवून भाजप मराठाविरोधी नाही, हे दाखविण्याचा याद्वारे प्रयत्न झाला.

राणेंनी सरसकट कुणबीकरण नाकारले

मात्र दुसरीकडे नारायण राणे, नितेश राणे आदी भाजप नेत्यांनी सरसकट कुणबी करण्याला विरोध केला. ही मराठ्यांची मागणी नसल्याचे वारंवार सांगितले. आता राणे हे बोलतात म्हणजे, फडणवीस यांची परवानगी घेऊनच बोलणार. त्यामुळे जरांगे यांच्या रडारवर राणे पितापुत्र आले. मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्याचे एक आश्वासन जरांगे पाटलांना दिले होते. मात्र असे सरसकट गुन्हे मागे घेतले जाणार नसल्याचे फडणवीस यांनी सांगताच जरांगेंना धक्का बसला. त्यानंतर जरांगेंनी फडणवीस यांना अंगावर घेण्यास सुरवात केली. आमचा त्यांच्यावरचा विश्वास उडत चालला आहे. त्यांनी वेळेच सुधारावे, असे थेटपणे जरांगे पाटलांनी जाहीरपणे सांगितले.

जरांगे यांच्या आंदोलनाच्या निमित्ताने भाजपच्या विरोधातील हवा ते पेटवत आहेत. असा संशय त्या पक्षातील नेत्यांना येऊ लागला आहे. इतर कोणत्याही नेत्यांबद्दल जरांगे बोलत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल ते कौतुकाचे शब्द काढतात. अजित पवार यांचे तर नावच घेत नाहीत. फडणविसांचे नाव घेतात ते टीका करण्यासाठीच. यामुळे आता फडणविसांचे शाऊटिंग ब्रिगेड आता त्यांच्यावर तुटून पडू लागली आहे. नितेश राणे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर हे जरांगेंच्या हेतूबद्दल शंका घेत आहेत. जरांगे यांनी फडणिसांबद्दल बोलताना दोनदा विचार करावा, आम्हीपण मराठा आहोत, असे राणेंनी स्पष्ट केले. तर इतरांनी जरांगे यांनी कोणाच्या तरी हातचे बाहुले बनू नये, असा इशारा दिला.

ओबीसींची व्होट बॅंक भाजपला सुरक्षित ठेवायची आहे. तसेच मराठ्यांचा विरोधही त्यांना परवडणारा नाही. त्यामुळे महायुतीने जरांगे पाटलांचा सारा विषय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सोपवला. भाजप यात पुढाकार घेत नाही. यात जरांगे पाटील हे येत्या लोकसभा निवडणुकीत जालना लोकसभा मतदारसंघातून उभे राहणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याला कोणी दुजोरा दिलेला नाही. पण भाजपने य पातळवीर पण तयारी केली आहे. जरांगे उभे राहिले तर रावसाहेब पाटील दानवे अडचणीत येऊ शकतात. इतर मतदारसंघांवरही परिणाम होऊ शकतो. हे सारे भाजपने लक्षात घेतले आहे. त्यामुळे जरांगे पाटलांच्या निमित्ताने आपल्या विरोधात हवा निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. यापुढील काळातही हा संघर्ष आणखी तीव्र होऊ शकतो.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube