ठाकरेंची अडचण, भाजपची गोची अन् राज्यसभेचीही सेटिंग : एका प्रवेशाने शिंदेंचे साधले, देवरांचेही फावले

ठाकरेंची अडचण, भाजपची गोची अन् राज्यसभेचीही सेटिंग : एका प्रवेशाने शिंदेंचे साधले, देवरांचेही फावले

मुंबई : माजी केंद्रीय मंत्री, माजी खासदार, मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मिलिंद देवरा (Milind Deora) यांनी अखेर पक्षाचा ‘हात’ सोडत शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी धनुष्य बाण हाती घेतला. देवरा यांच्याबरोबर दहा माजी नगरसेवकांनाही शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी खासदार गजानन किर्तीकर, उद्योगमंत्री उदय सामंत आदी उपस्थित होते. दरम्यान, देवरा यांना आता शिवसेनेकडून (Shivsena) शिवसेना (UBT) गटाचे खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात दक्षिण मुंबईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. (Milind Deora joined Shiv Sena in the presence of Shiv Sena chief Eknath Shinde)

मिलिंद देवरा (Milind Deora) दक्षिण मुंबई (South Mumbai Lok Sabha) मतदारसंघातून इथून निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसमधूनच (Congress) इच्छुक होते. मात्र महाविकास आघाडीत हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याचे दिसून येते आहे. यापूर्वी 2014 आणि 2019 अशा दोन्ही वेळी शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी याच मतदारसंघातून एक लाख मतांच्या फरकाने त्यांचा पराभव केला आहे. आता पुन्हा एकदा अरविंद सावंत या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत. शिवाय शिवसेनेतील फुटीनंतर सावंत एकनिष्ठ राहिल्याने उद्धव ठाकरे ही जागा काँग्रेसला सोडण्याची किंवा उमेदवार बदलण्याची शक्यता नाही. यामुळेच मिलिंद देवरा यांनी शिवसेनेचा मार्ग स्वीकारल्याचे सांगितले जाते.

 देवरांच्या रुपाने शिंदेंना मिळाला तगडा उमेदवार :

मिलिंद देवरा यांचा 2014 आणि 2019 असा सलद दोनवेळा या मतदारसंघातून पराभव झाला असला तरीही ते 2004 आणि 2009 असे सलग दोनवेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत. शिवाय ते केंद्रीय मंत्रीही राहिले आहेत. त्यांचे वडील इथून चार वेळा खासदार होते. ते ही केंद्रीय मंत्री होते. त्यामुळे देवरा यांच्यारुपाने एकनाथ शिंदे यांना मुंबई दक्षिण मतदारसंघातून तगडा उमेदवार मिळाला असल्याचे बोलले जाते. सोबतच शिवडी, परळ, लालबाग, वरळी, काळचौकी, भायखळा या भागातील मराठी भाषिकांची साथ मिळाल्यास अरविंद सावंत यांना आव्हान उभे राहु शकते.

भाजपची गोची :

गतवेळी शिवसेनेचा खासदार निवडून आल्याने महायुतीमध्ये ही जागा मिळावी आपल्यालाच मिळावी असा शिंदेंचा दावा आहे. मात्र शिवसेनेकडे सावंत यांना टक्कर देईल असा उमेदवार नसल्याचे म्हणत भाजपनेही या जागेवर डोळा ठेवला होता. भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर किंवा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नावांची या मतदारसंघातून चर्चा सुरु होती. मात्र आता देवरा यांच्या रुपाने एक मोठा नेता शिवसेनेत आल्याने शिवसेनेचा या जागेवरील दावा अधिक भक्कम मानला जात आहे. त्यामुळे भाजपची चांगलीच गोची झाल्याचे बोलले जात आहे.

शिंदेंना दिल्लीत मिळणार तगडा चेहरा :

शिवसेनेचा सध्या दिल्लीत एकही मोठा चेहरा नाही. दिल्लीच्या राजकीय वर्तुळात संपर्क असलेला, उठबस असलेला एक चेहरा शिंदेंना आवश्यक होता. ठाकरे यांच्याकडे प्रियांका चतुर्वेदी यांच्या रुपाने उत्तर भारतीय चेहरा आहे. आता शिंदेंसाठी हे काम देवरा करणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे देवरा यांच्या रुपाने शिवसेनेलाही दिल्लीच्या वर्तुळात एक तगडा चेहरा मिळू शकतो. हीच सर्व समीकरणे डोळ्यासमोर ठेवून देवरा यांच्या पक्षप्रवेशासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला असल्याचे सांगितले जात आहे.

राज्यसभेचेही सेटिंग :

दरम्यान, मिलिंद देवरा यांनी राज्यसभेचेही सेटिंग लावले असल्याचे बोलले जाते. येत्या मार्चमध्ये महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होणार आहेत. त्यात भाजपच्या तीन, राष्ट्रवादीची एक, काँग्रेसची एक आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची एक जागा रिक्त होणार आहे. शिवसेनेच्या रिक्त होणाऱ्या या एका जागेवरच देवरा यांचा डोळा असल्याचे बोलले जाते. आधी राज्यसभेवर जाऊन लोकसभेची निवडणूक लढवायची आणि लोकसभेला पराभव झाला तरीही राज्यसभेची खासदारकी कायम ठेवायची असा सेफ गेम देवरा यांनी खेळला असल्याचे सांगितले जात आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube