‘त्या’ शेतकऱ्याच्या अंत्यसंस्कारालाही जाऊ नये’; आमदार गायकवाड काल बोलून गेले अन् आज युटर्न मारला…
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंत्यसंस्कारालाही जाऊ नये, असं वादग्रस्त विधान आमदार संजय गायकवाड यांनी केलंय.
Mla Sanjay Gaikwad : नेहमीची वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत असलेले शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Mla Sanjay Gaikwad) आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. दुष्काळामुळे अनेक ठिकाणी शेतकरी आत्महत्या करीत असल्याचं चित्र आहे. अशातच आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान करुन खळबळ उडून दिलीयं. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंत्यसंस्कारालाही जाऊ नये, असं वादग्रस्त विधान आमदार संजय गायकवाड यांनी केलंय.
पुढे बोलताना आमदार संजय गायकवाड म्हणाले, आपली अर्धांगिनी, मुलांना वाऱ्यावर सोडून हे शेतकरी आत्महत्या करतात. बायकोसोबत सात जन्माची शपथ घेतात, सात फेरे घेतात. मात्र आत्महत्या करतात. त्यामुळे यांच्या अंत्यसंस्काराला जाऊ नये. त्यांना जनावरे खातील, तेंव्हा कसे हाल होतात याची जाणीव होईल, तेंव्हा ते आत्महत्या करणार नाही, असं संजय गायकवाड म्हणाले आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुलढाणा दौऱ्यादरम्यान शेतकऱ्यांबद्दल विधान केलं होतं. आंबेडकर यांच्या या विधानावर माध्यम प्रतिनिधींनी आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया घेतली. यावेळी संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केलंय.
शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याऐवजी दहा-बारा पुढाऱ्यांना मारावे असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केले होते त्यानंतर बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी शेतकरी आत्महत्या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. शेतकरी कुटुंबाला वाऱ्यावर सोडून आत्महत्या करतो. त्याला काही अडचण असेल तर त्याने आमदार खासदार यांना चिठ्ठी लिहावी आम्ही सर्व मिळून त्याची मदत करू. मात्र, शेतकरी कुठल्याही विचार न करता आत्महत्या करतात..त्यामुळे त्यांच्या मातीवरही जाऊ नये असे ते म्हणाले.
मी व्यसनाधीन तरुणांच्या आत्महत्येवर बोललो होतो..
माझे कालचं शेतकऱ्यांबद्दलचं जे बोलणं आहे ते माझ्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचं सेवन गांजा, दारुचे सेवन करुन तरुण बेभान होतात. त्यातून टोकाचं पाऊल उचलतात आणि आपलं आयुष्य संपवतात. त्यामुळे त्यांचा परिवार उध्वस्त होतो, त्यावर मी भाष्य केलं होतं. अशा प्रकारच्या आत्महत्या करणे चुकीचं असल्याचं मी त्यावर बोललो होतो, या शब्दांत आमदार संजय गायकवाड यांनी युटर्न घेतला आहे.