शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या आमदारांना ‘संघाच्या’ पायघड्या : निवडणुकांसाठी सरसंघचालक देणार कानमंत्र

शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या आमदारांना ‘संघाच्या’ पायघड्या : निवडणुकांसाठी सरसंघचालक देणार कानमंत्र

प्रफुल्ल साळुंखे : (विशेष प्रतिनिधी)

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्थापक आणि पहिले सरसंघचालक दिवंगत केशव बळीराम हेडगेवार (Keshav Baliram Hedgewar) यांना अभिवादन करण्यासाठी यंदा पहिल्यांदाच शिवसेना आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदारांनाही निमंत्रण पाठविण्यात आले. उद्या (19 डिसेंबर) सकाळी आठ वाजता सर्व आमदार आणि खासदार यांना संघ मुख्यालयात येण्यासाठीचे पत्र पाठविण्यात आले आहे. शिवाय ज्या आमदारांकडे स्वतःचे वाहन नाही अशा आमदारांसाठी आमदार निवासापासून बसची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

नागपूर हिवाळी अधिवेशनकाळात (Winter session) दिवंगत हेडगेवार यांना अभिवादन करण्यासाठी भाजपचे आमदार आणि खासदार संघ मुख्यालयात जातात. यंदा भाजपच्या आमदारांसोबतच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना निमंत्रण देण्यात आले आहे. या निमित्ताने पहिल्यांदाच राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे आमदार-खासदार उपस्थित राहणार आहेत. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने तिन्ही पक्षांच्या आमदारांना आणि खासदारांना काय कानमंत्र देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

बाळासाहेब अन् उद्धव ठाकरेंनी राखले होते अंतर :

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात असताना शिवसेनेचे आमदार कधी संघ मुख्यालयात गेले नाहीत. पुढे उद्धव ठाकरे यांच्या हातात पक्षाची सूत्र आल्यानंतरही सेना आमदार कधीच संघाच्या मुख्यालयात गेले नाहीत. दुसऱ्या बाजूला विचारधारा म्हणून कायम राष्ट्रवादी काँग्रेसने संघ आणि हिंदुत्वापासून चांगलाच अंतर ठेवलं होतं. विशेषत स्व. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना हिंदू दहशतवाद हा शब्द पहिल्यांदा प्रचलित झाला होता.

मात्र, आता शिवसेनेमध्ये फूट पडली आहे. भाजपशी जवळीक साधून शिंदे गट सत्तेत सहभागी झाला. त्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने भाजपसोबत जुळवून घेतले.

अशात आता हे दोन्ही गट हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात आहे. त्यामुळे या आमदारांना संघाने आमंत्रित केले असल्याचे सांगण्यात येत आहे. पण यामुळे वर्षानुवर्षे ज्या संघावर राष्ट्रवादीने पक्षाचे धोरण म्हणून टीका केली. त्याच पक्षाच्या आमदारांना आता संघाच्या वास्तूत जाण्याची वेळ आली आहे. हेडगेवार आणि संघ मुख्यालयाची ओळख करुन घेण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना सज्ज झाली आहे.

Dawood Ibrahim : कलाकारांना धमक्या ते बॉलीवूड अभिनेत्रीशी अफेअर? असं होतं दाऊदचं बॉलिवूड कनेक्शन… 

2019 मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. त्यात बरेच आमदार हे भाजपच्या चिन्हावर निवडून गेले. विशेषत: काँग्रेससच्या मुशीत तयार झालेले राधाकृष्ण विखे पाटील, नितेश राणे यांच्यासारखे नेत्यांना भाजप आणि संघाशी जळवून घेतले. हे दोन्ही नेते संघ मुख्यालयात गेले. त्यावेळी याविषयी चांगलीच चर्चा झाली होती. आता शिवसेनेचे ( शिंदे गट) आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आता संघ कार्यालयात हजेरी लावणार आहेत.

निवडणुकांची भीती, भाजप चिन्हाची ओढ :

एकेकाळी संघ विचारधारेपासून चार हात लांब राहणाऱ्या नेत्यांना आता राजकीय बदल जाणवू लागला आहे. आगामी निवडणुकांमध्ये जागावाटपात ज्याला भाजपचे चिन्ह मिळाले, त्याचा विजय सोपा असे गणित आता सर्वांनी पक्क केले आहे. उत्तर भारतातील तीन राज्यात भाजपने मिळवलेल्या विजयामुळे महाराष्ट्रात मोदी फॅक्टर काम करेल हे नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे आपल्या पक्षापेक्षा भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण तयार आहेत. विशेषत: शिंदे गटातील बहुतांश आमदार खासदारांच्या मनाची तशी तयारी आहे. ही सर्व परिस्थिती पाहाता आता भाजपला थेट विरोध करण्याची कुठल्याही नेत्यांची मानसिक तयारी नसल्याचे दिसते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube