भावी महिला मुख्यमंत्री पोस्टरवरुन Supriya Sule संतापल्या; म्हणाल्या महिलेचा फोटो…
बारामती : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा फोटो भावी मुख्यमंत्री (Future Maharashtra CM) म्हणून लावण्यात आला. या फोटोवरुन सुप्रिया सुळे चांगल्याचं संतापल्या आहेत. (Supriya Sule Hoarding) महिलेचा फोटो कुठेही वापरता येत नाही आणि फोटो लावण्याचा कोणालाही अधिकार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. सुप्रिया सुळे आज बारामती (Baramati) तालुक्यातील गावभेटीच्या दौऱ्यावर आहेत, त्यावेळी त्या बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, एकतर पोस्टर कोणी लावला ? हा पुरावा असला पाहिजे. कोणी कोणाचे पोस्टवर फोटो लावले पाहिजेत, याचा कोणाला अधिकार नाही. एका महिलेचा फोटो पोस्टरवर लावणे. याचा कुणाला देखील अधिकार नाही. जर कोणी लावला असेल आणि त्याच्यावर कोणाचं नाव नसेल, तर माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे. माझा फोटो किंवा पोस्टर मला न सांगता कुठल्या पुरुषाने किंवा महिलेने लावला असेल, तर मला मुंबई पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
हा पोस्टर कोणत्या पक्षाने लावलाय का ? कोणत्या व्यक्तीने लावलाय का ? असा फोटो किंवा पोस्टर कोणी लावू शकतो का ? जर हा फोटो असा लावला असेल तर हा देश कायदे नियमाने चालतो. यामुळे महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांनी मला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी मुंबई पोलिसांकडे यावेळी केली आहे.
Supriya Sule Hoarding : ‘नाद करायचा नाय, सुप्रियाताई भावी मुख्यमंत्री’
नेमकं काय लिहिलय बॅनरवर ?
महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री सौ. सुप्रियाताई सुळे. नाद नाय करायचा ! असा मजकूर या बॅनरवर लिहिला होता. तसेच या बॅनरवर सुप्रिया सुळे यांच्याबरोबर त्याचे वडील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाही फोटो लावण्यात आला. याअगोदर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि विरोधीपक्ष नेते अजित पवारांचा फोटो देखील भावी मुख्यमंत्री म्हणून लावण्यात आला होता.
अजित पवारांच्या बॅनरवर ‘महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री…, एकच दादा, एकच वादा, अजित दादा…’ अशा आशयाचा मजकूर लिहिला होता. यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या दोन्ही बॅनरवर कोणाचंही नाव नव्हतं. दोन्ही बॅनर एकाच साईजचे आहेत. हे बॅनर लावणं हा माझ्यावर आणि अजित पवार यांच्यावर अन्याय आहे. यासंदर्भात मुंबई पोलिसांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे, असंही त्या यावेळी म्हणाल्या.