नारायण राणेंचे राष्ट्रवादीत जाण्याचे ठरलं ! पण पहाटेच्या वेळी विखेंनी पवारांना कशी धोबीपछाड दिली ?

Narayan Rane-राणे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) जाणार होते, त्यांचा प्रवेश आणि मंत्रिपदही ठरलेले होते.

  • Written By: Published:
Narayan Rane

Narayan Rane: माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीयमंत्री व सध्याचे लोकसभेचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांची पंच्चाहत्तरी नुकतील पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितिन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. शिवसेना, काँग्रेस, स्वतःच पक्ष आणि आता भाजप (BJP) असा नारायण राणे यांचा राजकीय प्रवास झालाय. राणे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) जाणार होते, त्यांचा प्रवेश आणि मंत्रिपदही ठरलेली होती. पण राणे हे अचानक काँग्रेसमध्ये कसे दाखल झाले हे तटकरे यांनी जाहीरपणे आपल्या भाषणात सांगून टाकले. राणे यांच्या काँग्रेस प्रवेशाची काय स्टोरी होती होती हे जाणून घेऊया…

नारायण राणे हे बाळासाहेब ठाकरे यांचे खास आणि जवळचे होते. त्यामुळे 1995-99 च्या युती सरकारमध्ये राणे हे महसूल मंत्री झाले आणि त्यानंतर 1999 ला दहा महिने ते मुख्यमंत्रीपदावर राहिले. नंतर शिवसेनेतही अनेक बदल होत गेले. पक्षाचे उद्धव ठाकरे यांच्याकडे सूत्र जात होती. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांचे खटके उडू लागले होते. त्यामुळे 2005 मध्ये नारायण राणे यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला होता. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीची सत्ता होती आणि विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री होते. तेव्हा कोकणातील राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी नारायण राणे यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करावे, अशी गळ तटकरे यांनी राणेंना घातली होती. त्यानंतर शरद पवार, अजित पवार यांचीही नारायण राणे यांनी भेट घेतली. राणे यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद आणि ऊर्जामंत्री देण्याचे ठरले. कारण राणे एकटे राष्ट्रवादीत येणार नव्हते, काही आमदार बरोबर घेऊन येणार होते. तेव्हा राणे कोकणाचे बलाढ्य नेते होते. शेवटची बैठक दिल्लीत ठरली.

शरद पवारांना बाळासाहेब विखेंचा धक्का

राणे हे दिल्लीतील ताज मानसिंग हॉटेलमध्ये थांबलेले होते. पहाटे पावणेतीन वाजता बाळासाहेब विखे पाटील थेट राणे हे थांबलेल्या ताज मानसिंग हॉटेलमध्ये दाखल झाले. राणे यांना बरोबर घेत काँग्रेसचे राजकीय चाणक्य असलेले अहमद पटेलांकडे घेऊन गेले. राणे यांनी राष्ट्रवादीत न जाता काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा राणेंना मुख्यमंत्रिपदावर बसविले जाईल, असा शब्द दिला गेला होतो. परंतु राणे यांच्या आडून बाळासाहेब विखेंनी शरद पवारांना शह दिलेला होता. कारण तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सर्वात मोठा पक्ष होता. राष्ट्रवादीचे 71 आमदार होते. तर काँग्रेसचे 69 आमदार होते. राणे हे काही आमदारांबरोबर राष्ट्रवादीत आले असते तर राष्ट्रवादीचे ताकद वाढली असती. काँग्रेसमध्ये प्रवेश करताना राणे हे पाच आमदार बरोबर घेऊन आले होते. त्यानंतर मुख्यमंत्रिपदही राष्ट्रवादीकडेही गेलं असतं, याचा विचार करून विखे यांनी शरद पवारांना शह दिल्याचे बोलले गेले. पण राणेंना काँग्रेसने उद्योगमंत्री, महसूलमंत्री केलं पण मुख्यमंत्रीपदावर मात्र बसविले नाही. कांग्रेसमध्ये आल्यानंतर सहा महिन्यांमध्ये मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन राणे यांनी दिल्ली हायकमांडकडून मिळालं होतं.

तीनदा संधी मिळून मुख्यमंत्रीपदाची राणेंना हुलकावणी
तिनदा संधी मिळून राणेंना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर विलासराव देशमुख हे मुख्यमंत्रीपदावरून पाय उतार झाले. राणे हे मुख्यमंत्री होतील असं वाटतं होतं. पण अशोक चव्हाणांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडली.तेव्हा राणे यांनी काँग्रेस नेत्यांवर आगपाखड केली होती. 2009 ला विधानसभा निवडणूक झाली आणि पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी सरकार स्थापन झाले. पुन्हा अशोक चव्हाण हे मुख्यमंत्री झाले. राणे यांची दुसर्यांदा मुख्यमंत्रीपदाची संधी हुकली. 2010 मध्ये मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श इमारत घोटाळ्याचा आरोप झाला आणि अशोक चव्हाण पदावरून पाय उतार झाले. पण त्यांच्या जागी पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद दिले. तिसऱ्यांदा राणे यांना मुख्यमंत्रीपदाने हुलकावणी दिली होती. त्यानंतर काँग्रेसने फसविले असे अनेकदा जाहिरपणे राणे यांनी सांगितले.

त्यानंतर राणे यांना 2014 ला मोठे धक्के बसले. ते विधानसभेला पराभूत झाले. तर मुलगा निलेश राणेही लोकसभेला पराभूत झाला. तब्बल बारा वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर राणे 2017 ला महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष काढला. त्यानतंर ते भाजपमध्ये गेले. काँग्रेसमध्ये पडता काळ पाहिला पण भाजपमध्ये पुन्हा राणे कुटुंबाला चांगले दिवस आले आहेत.

follow us