‘तेव्हा मशिदीत बॉम्बस्फोट झाल्याची अफवा पवारांनी का पसरवली?’, राणेंचा पवारांना थेट सवाल
Narayan Rane on sharad pawar : इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचे (Israel-Palestine War) पडसाद जगभर उमटत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर त्यांनी इस्रायलला समर्थन केलं. तर देशातील काही संघटना आणि राजकीय पक्षांनी पॅलेस्टाईची बाजू घेतली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनीही पॅलेस्टाईनची बाजू घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींच्या भूमिकेवर टीका केली. याला आता केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं.
CNP नाशिक येथे विविध पदांसाठी बंपर भरती, महिन्याला 95, 910 रुपये पगार
नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, शरद पवारांनी इस्रायल आणि हमासबाबत घेतलेली भूमिका चुकीची आहे. त्यांनी पंतप्रधान मोदींवर केलेली टीकाही चुकीची आहे. इस्रायलवरील दहशतवादी हल्ल्याबाबत मोदींनी आपली भूमिका मांडतांना सांगितलं की, दहशतवाद हा कोणत्याही व्यक्ती किंवा देशाविरुद्ध नसून मानवतेविरुद्ध आहे. मोदींची भूमिका दहशतवादाच्या विरोधात आहे. त्यांनी घेतलेली भूमिका ही पॅलेस्टिनी विरोधी भूमिका नाही. तरीही पवारांनी मोदींच्या भूमिकेवर आक्षेप घेतला. मग दहशतवादाविरोधी भूमिका घेणे चुकीचे आहे, असे पवारांना म्हणायचे आहे का? असा सवाल त्यांनी राणेंनी केला.
राणे म्हणाले, शरद पवार यांनी आजवर देशात आणि राज्यात अनेक पदे भूषवली आहेत. ते संरक्षण मंत्री राहिले, कृषी मंत्री होते. ते चार वेळा राज्याचे मुख्यमंत्रीही होते. मी त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की १२ मार्च १९९३ रोजी साखळी बॉम्बस्फोटात १५७ लोक मारले गेले होते. तर 1400 लोक मरण पावले होते. तेव्हा मशिदीत बॉम्बस्फोट झाला अशी अफवा पवारांनी का पसरवली? तेव्हा पवारांनी दहशतवाद्यांना वाचवण्याची भूमिका का घेतली होती? पवार साहेब देश प्रथम ही भूमिका कधी घेणार आहेत, असा सवाल राणेंनी केला.
शरद पवार हे काही लोकांना वाचवण्यासाठी ना देशाच्या हिताचे बोलतात, ना समाजाच्या हिताचे बोलतात. शरद पवारांना मोदी विरोधाची कावीळ झाल्यानं त्यांना मोदींची कामं दिसत नाही. जनतेला वाहून घेतलेल्या लोकांवर तुम्ही टीका करता. गेल्या ९ वर्षात ५५ योजना मोदींना जाहीर केल्या. मात्र, मोदींच्या चांगल्या कामावर पवारांचं दुर्लक्ष होतं. तुष्टीकरण सोडून देशाची बाजू घ्यावी, असं राणे म्हणाले.
पवार काय म्हणाले होते?
या युद्धाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले होते की, जिथे हे युद्ध सुरू आहे ती जमीन पॅलेस्टिनी नागरिकांची आहे. त्याच ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले आणि त्यानंतर इस्रायल राष्ट्राचा जन्म झाला. पण आपल्याला त्या वादात पडायचे नसले तरी आपले भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी या सर्वांनी पॅलेस्टाईनला मदत केली होती. तर आता त्या विरोधात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलची बाजू घेतली आहे. यामध्ये त्यांनी पॅलेस्टाईनकडे दुर्लक्ष केले आहे, अशी टीका पवारांनी केली होती.