Nationalist Congress Party Shirdi Camp : विधानसभा निवडणूक पार पडल्या. त्यानंतर आता येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार पडणार आहेत. या अनुषंगाने राजकीय पक्षांकडून आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवत मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. याचाच भाग म्हणून नुकतेच जिल्ह्यातील साई नगरी म्हणून परिचित असलेल्या शिर्डी येथे भाजपचे महाअधिवेशन पार पडले तर त्यापाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नवं संकल्प शिबीर (Nationalist Congress Party Shirdi Camp) देखील याच शिर्डीमध्ये संपन्न झाले. दरम्यान, शिबीर जरी राष्ट्रवादीचे होते मात्र हे शिबीर दोन राजकीय नेत्यांमुळेच चांगलेच गाजले. अर्थातच शिबिराचे मुख्य केंद्रस्थान राहिले ते म्हणजे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chagan Bhujbal) व दुसरे लोकप्रतिनिधी म्हणजे बीड प्रकरणावरून राज्यात चर्चेचा विषय बनलेले धनंजय मुंडे (Dhananjay Munde) हे होय.
दक्षिण सीमेवर आणीबाणी, थर्ड जेंडर संपले; शपथविधीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या 13 मोठ्या घोषणा
ओबीसी नेत्यांना डावलल्याची चर्चा…
विधानसभा निवडणुका या पार पडल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले. मात्र त्यापूर्वी राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहायला मिळाला. छगन भुजबळ हे ओबीसींचा चेहरा म्हणून नावारूपास आले. सत्तेत असतानाही ओबीसींसाठी आक्रमक भूमिका घेत भुजबळांनी आवाज उठवला होता. दरम्यान निवडणुका पार पडल्यानंतर महायुती सत्तेत आल्यानंतर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने देखील भरघोस यश मिळवले. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळामध्ये भुजबळ यांना महत्वाचे खाते मिळेल असे वाटत असताना भुजबळांना डावललं गेलं. त्यानंतर नाराज झालेल्या भुजबळांनी वेळोवेळी आपली नाराजी जाहीर व्यक्त देखील केली व राष्ट्रवादीमधील अंतर्गत कलह हा समोर आला.
येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने राष्ट्रवादीने शिबिराच्या माध्यमातून आगामी निवडणुकांची रणनीती आखण्यासाठी लोकप्रतिनिधींसह अधिकारी व पदाधिकार्यांना एकत्र बोलावले. या बैठकीला भुजबळ उपस्थित राहणार की नाही याचीच अधिक चर्चा रंगली. भुजबळ यांनी शिबिराला हजेरी लावली व हा पक्षाचे कार्यकर्ता शिबिर आहे, कोणा एका व्यक्तीचे नाही, मी पक्षासाठी आलो आहे, अशा शब्दात भुजबळ यांनी पक्षाशी आपली नाळ जोडली असल्याचे सांगतच अजित पवारांवर नाराजी जाहीर व्यक्त देखील केली. त्यांनतर शिबिरामध्ये आणखी एका व्यक्तीची चर्चा झाली ती म्हणजे धनंजय मुंडे. बीड प्रकरणामुळे मुंडे हे चांगलेच अडचणीत सापडले आहे.
पालकमंत्रिपदावरून धनंजय मुंडेंचा पत्ता कट…
शिर्डी येथे झालेल्या राष्ट्रवादीचे शिबिराला धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार का याबाबत देखील तर्क वितर्क लावण्यात आले. दरम्यान बीड येथील वाल्मिक कराड व संतोष देशमुख प्रकरणामुळे मंत्री मुंडे हे अडचणीत सापडले. त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली. याच सर्वप्रकारणामुळे मुंडे शिबीरस्थळी उपस्थित राहणार नाही असे बोलले जात होते. यातच भरात भर म्हणजे एक दिवस आधी राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाली व यामध्ये बीडचे पालकमंत्रिपद अजित पवार यांच्याकडे देण्यात आले. यामुळे या यादीतून धनंजय मुंडे यांना डावलण्यात आलं. आपण स्वतःहून अजित दादांनी बीडचा पालकत्व स्वीकारावं असे जरी मुंडे बोलत असले तरी त्यांची नाराजी जाहीररीत्या दिसून येत होती.
पंकजांना हवे होते बीडचे पालकत्व…
धनंजय मुंडे यांना बीडच्या पालकमंत्रीपदापासून दूर ठेवण्यात आल्यानंतर त्यांच्या भगिनी आणि राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी नुकतेच एक वक्तव्य केले. जालन्याचं पालकमंत्रीपद मला मिळालं त्यात मी खुश आहे. मात्र, मला बीडचं पालकमंत्रीपद मिळालं असतं तर मला अधिक आनंद झाला असता. कारण मी पाच वर्ष बीडची पालकमंत्री होती. तेव्हा बीडचा विकास चांगला झाला होता असे सांगत बीडच्या पालकमंत्रिपदावर आपला ठाम दावा होता, असे पंकजा मुंडे यांच्याकडून अप्रत्यक्षपणे सांगण्यात आल्याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे. मात्र एकीकडे सध्याची परिस्थिती आपण पहिली तर भुजबळ मुंडे हे ओबीसी समाजाचे चेहरे बनले जात आहे. व याच चेहऱ्यांना कोठेतरी सध्या बाजूला सारले जात असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.