धनंजय मुंडेंची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा, गोपीनाथ मुंडे असते तर लाथ मारून…; नितीन देशमुखांचा निशाणा
Nitin Deshmukh : अकोल्यातील जनआक्रोश मोर्चात शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) असते तर धनंजय मुंडे यांना घरातूनच नव्हे तर जिल्ह्यातून लाथ मारून हाकलून लावले असते, असा हल्लाबोल देशमुख यांनी केला.
पालकमंत्रिपदावरून आमच्या लाडक्या बहिणीवर अन्याय…; जयंत पाटलांचा महायुती सरकारला टोला
मुंडेची मंत्रिपदावरून हकालपट्टी करा…
सध्या महाराष्ट्रात संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी हत्याकांडाच्या निषेधार्थ महाराष्ट्रात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले जात आहे. या मोर्चात विरोधी पक्षांचे अनेक नेते सहभागी होत धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे. आज अकोल्यात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला संबोधित करतांना नितीन देशमुख म्हणाले की, बीड जिल्ह्यातील घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आजपर्यंत आपल्या देशात कधीच अशी घटना घडलेली नाही. वाल्मिकी टोळी ही राक्षसी प्रवृत्तीची टोळी आहे. या घटनेच्या निषेधात विदर्भातही मोर्चे निघत आहेत. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत, ते काय निर्णय घेतात याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. मंत्रिमंडळातून एखाद्या मंत्र्यांची हकालपट्टी करण्याचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांचे असतात. फडणवीसांना विनंती आहे की, महाराष्ट्राला तुमच्याकडून अपेक्षा आहेत. धनंजय मुंडे स्वतःहून राजीनामा देणार नाहीत, त्यामुळं त्यांची हकालपट्टी करा, अशी मागणी देशमुख यांनी केली.
पुढं ते म्हणाले की, धनंजय मुंडे मंत्रिपदावर राहिले तर त्याचा फायदा वाल्मिक कराडला होईल. त्यामुळे मुडेंनी राजीनामा द्यावा, असं देशमुख म्हणाले. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा मित्र आणि धनंजय मुंडे यांचे मित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र संशयाच्या भोवऱ्यात आहे. महाभारतातल्या कर्णाप्रमाणेच धनंजय मुंड हे त्याच्या मित्राला साथ देतील, अशी शंका यावेळी देशमुख यांनी उपस्थित केली.
दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांनी रविवारी अजित पवार गटाच्या शिर्डी येथील शिबीरात वाल्मिक कराडसोत आर्थिक हितसंबंध असल्याचा दावा फेटाळून लावला. या सर्व बातम्या खोट्या असल्याचं मुंडे यांनी म्हटलं. मात्र, प्रकाश सोळंके यांनी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्यामुळेच मोठा झाल्याचं म्हटलं. धनंजय मुंडे यांच्याकडे सातत्याने बीडचे पालकमंत्रीपद असल्यानच जिल्ह्याची वाट लागली आहे. वाल्मिकला कोणी पोसले? तो कोणाचा माणूस आहे? धनंजय मुंडेंमुळेच तो मोठा झाला, असं प्रकाश सोळंके यांनी म्हटले आहे.