‘ठरवलं… खटक्यावर बोट अन् जागेवर पलटी’; रोहित पवारांचा हसन मुश्रीफांना इशारा

‘ठरवलं… खटक्यावर बोट अन् जागेवर पलटी’; रोहित पवारांचा हसन मुश्रीफांना इशारा

Rohit Pawar Kolhapur : कोल्हापूरच्या लोकांनी एकदा ठरवलं की ते त्यांना पाहिजे ते करूनच दाखवतात.खटक्यावर बोट अन् जागेवर पलटी. जे जे लोक आपला विचार सोडून पलीकडे गेले, ज्यांना या भूमीला महत्व द्यायचं नसेल तर मग कोल्हापूरकरांना माहिती आहे की त्याचं काय करायचं, अशा शब्दात आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) बंडखोर आमदारांना इशारा दिला.

कोल्हापुरातील दसरा चौकात आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या सभेत रोहित पवार बोलत होते. ते म्हणाले की, कोल्हापूरची सभा दसरा चौकात होणार असल्याचे शरद पवारांना आयोजकांना सांगितलं. मात्र, शरद पवारांची सभा इतक्या छोट्या मैदानावर का, असा सवाल एका मंत्र्यांनी उपस्थित केला. या दसरा चौकाला ऐतिहासिक महत्त्व आहे. येथं शाहू महाराजांचा पुतळा आणि त्यांचे स्मारक आहे. परिसरात सर्व समाजासाठी, सर्व घटकांना शिकता यावं यासाठी वसतिगृह उभारण्यात आले आहे. या मैदानातून चांगल्या गोष्टी घडतात, सामाजिक संघटनेची बैठक येथूनच होत असते. शाहु महाराजांनी समतेचा विचार इथूनच देशाला दिला. पलीकडे गेल्यामुळं त्यांना शाहू महाराजांच्या विचारांचा विसर पडला, असा टोला त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना लगावला.

घरातील महिलेने धाडस दाखविले पण पुरुष…शरद पवारांचा मुश्रीफांवर हल्लाबोल 

भाजप आणि अजित पवार गटावर बोलतांना रोहित पवार म्हणाले, वटवृक्षाला असलेल्या पारंब्या बलाढ्या शक्ती काढत आहे. वटवृक्षाच्या पारंब्या काढल्या तर वृक्ष कमकुवत होईल, असं काहींना वाटतंय. पण, त्यांच्या पारंब्या खोलवर रुजल्या आहेत. या वटवृक्षाचा नाद कुणी करायचा नाही. या वटवृक्षाची शक्ती फार मोठी आहे. दिल्लीच्या तख्तापुढे महाराष्ट्र कधीच झुकला नाही, आजही झुकलेला नाही आणि भविष्यातही झुकणार नाही, असं रोहित पवारांनी ठणकावलं.

रोहित पवारांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे, अशी टीका माझ्यावर होते. पण मी राजकारणात जागा घेण्यासाठी आलो नाही. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार जपण्यासाठी आणि त्याला ताकद देण्यासाठी मी राजकारणात आलो. पुरोगामी विचार जपण्यासाठी आणि प्रतिगामी विचारसरणीला जागा दाखवण्यासाठी मी राजकारणात आलो आहे, असं रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार म्हणाले, राष्ट्रवादीत फूट नाही, राष्ट्रवादी फक्त पक्ष नाही, ही विचार आहे. कार्यकर्ते ही राष्ट्रवादीची ताकद आहे. तुम्ही कुटुंब आणि पक्ष तोडू शकता. पण, कार्यकर्त्याचा विचार कधीच तोडू शकत नाही. मराठी माणूस आणि महाराष्ट्राचा हा सह्याद्री कधीच दिल्लीसमोर झुकला नाही. यापुढे झुकणार नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube