Supriya Sule : ‘काही लोकांकडून आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न’; सुळेंनी नेमकं काय सांगितलं?

Supriya Sule : ‘काही लोकांकडून आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न’; सुळेंनी नेमकं काय सांगितलं?

Supriya Sule : राज्यात मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाने (Maratha Reservation) हिंसक वळण घेतले. मराठवाड्यात आंदोलन अधिक उग्र झाले असून आमदारांचे घर आणि कार्यालय पेटवले गेले. या पाठोपाठ बसेसही फोडण्यात आल्या. त्यामुळे बीडमध्ये संचारबंदी लागू करण्याचा आदेश प्रशासनाने कालच घेतला होता. बीडपाठोपाठ आता धाराशिवमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या घडामोडी असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्विटरवर पोस्ट लिहीत प्रतिक्रिया दिली आहे.

राज्यात काही ठिकाणी अज्ञात व्यक्ती सार्वजनिक मालमत्ता, बसची जाळपोळ, तोडफोड करत आहेत. यामुळे अनेक ठिकाणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. माझे नागरिकांना नम्र आवाहन आहे की कृपया आपण सर्वांनी संयम ठेवावा व शांतता राखावी. आरक्षणाचे आंदोलन विधायक मार्गाने सुरू आहे. त्याला गालबोट लावण्याचे प्रयत्न काही लोक करत आहेत. माझे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना नम्र विनंती आहे की त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी, असे खासदार सुळे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Maratha Reservation : आंदोलनाचा भडका! बीडपाठोपाठ धाराशिवमध्येही संचारबंदी

सरसकट कुणबी प्रमाणपत्रावर ठाम 

मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी स्थापन केलेला मंत्रिमंडळ उपसमितीतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना चर्चेसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील यांनी मराठा समाजास सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी ठाम असल्याचे सांगून आंदोलम सुरुच ठेवणार असल्याचे सांगितले.

धाराशिवमध्ये संचारबंदी लागू 

बीडपाठोपाठ धाराशिवमध्येही आंदोलन चिघळले होते. एसटी बसवर दगडफेक, बस जाळणे, तहसीलदारांच्या वाहनावर हल्ले, लोकप्रतिनिधींच्या घरांवर हल्ले तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना वाढल्या. जिल्ह्यात अनेक ठिकाणी खासगी मालमत्तेचेही नुकसान करण्यात आले. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा विचार करता जिल्हाधिकाऱ्यांनी आज जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले.

Maratha reservation : जाळपोळीचं लोण आता नगरमध्येही, रोहित पवारांच्या मतदारसंघात जाळले टायर

नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी बंदची हाक 

राज्यभरामध्ये मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने (Maratha Reservation) आंदोलन तीव्र होताना दिसून येत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी नगर जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन सुरु झाले असून या आंदोलनाला आता पाठिंबा देखील वाढू लागला आहे. नुकतेच शिर्डी येथे आरक्षणासाठी सोमवारी बंद पाळण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जामखेड व राहुरी याठिकाणी बंद पाळण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बीडमध्ये आमदारचे घर अन् कार्यालय जाळले 

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन सोमवारी हिंसक झाले आहे. मराठवाड्यात आंदोलनकर्त्यांनी जाळपोळ सुरू केली. बीड जिल्ह्यात दोन आमदारांचे घरे पेटविण्यात आली. बीडमधील माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या निवासस्थानला आग लावण्यात आली. त्यानंतर बीड शहरात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे निवासस्थानाला आंदोलनकर्त्यांनी आग लावली. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालयही पेटवून देण्यात आले. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निवासस्थानाबाहेरील पाच ते सहा वाहने जळाली. या परिस्थिती जिल्हा प्रशासनाने येथे तत्काळ संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube