NCP News : अजितदादांनी आव्हाडांसाठी काय केलं? परांजपेंनी इतिहासातील यादीच वाचली

NCP News : अजितदादांनी आव्हाडांसाठी काय केलं? परांजपेंनी इतिहासातील यादीच वाचली

NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांत सध्या जोरदार शाब्दिक वाद सुरू झाले आहेत. अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख करत टीका केली होती. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनीही काल अजितदादांच्या वाढलेल्या पोटाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत खोचक प्रत्युत्तर दिले होते. त्यांच्या या पोस्टवर आता अजित पवार गटाचे (NCP News) नेते आक्रमक झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार जितेंद्र आव्हाड यांच्यामागे नेहमीच सह्याद्रीसारखे ठामपणे उभे राहिले पण जितेंद्र आव्हाड यांनी कायमच अजितदादांचा तिरस्कार, दुस्वास, द्वेष केला आहे असे प्रत्युत्तर अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी दिले.

परांजपे पुढे म्हणाले, काल मध्यरात्री अजितदादांचे चित्र ट्विट केले होते. तेव्हा ते त्यांनी कोणत्या अवस्थेत केले होते हे माहिती नाही. मुळात आव्हाडांना राज्यात प्रसिद्ध व्हायचे होते. टीआरपी वाढवायचा होता म्हणून ते प्रतिक्रिया देत होते. तसं पाहिलं तर अजितदादा 2009 ते 2014 या काळात राज्याचे अर्थमंत्री असताना त्यांनीच जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघासाठी भरघोस निधी दिला. यामुळेच आव्हाडांना विकासाची कामं करता आली. विनयभंगाच्या केसमध्ये जेव्हा आव्हाड खचले होते तेव्हा त्यांच्या घरी जाऊन त्यांना साडेतीन तास धीर देण्याचे काम अजितदादांनीच केलं होतं. आव्हाड त्यावेळी राजीनामा देण्याच्या मानसिकतेत होते तेव्हा अजितदादांनीच त्यांना सावरलं होतं.

अजितदादांविरोधात आव्हाडांनीच आम्हाला आंदोलन करायला लावले. भाजप नेते किरिट सोमय्या, त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उपसभापती नीलमताई गोऱ्हे यांच्यावर व्यक्तीगत टीका केली. पण जेव्हा त्यांच्यावर टीका होते तेव्हा ते बिथरतात असे परांजपे म्हणाले.

काय म्हणाले होते आव्हाड ?

जितेंद्र आव्हाड यांनी काल अजित पवार यांचा एक फोटो ट्विट करत त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. आव्हाड यांनी मिश्कील भाषेत अजित पवार यांच्यावर टीप्पणी केली. या पोस्टमध्ये आव्हाड यांनी म्हटले होते, की दादा त्या दिवशी पत्रकार परिषदेत तुम्ही माझ्या वाढलेल्या पोटाचा उल्लेख केला तेव्हा मला वाटले की तुम्ही व्यायाम करून 6 पॅक अॅब्स केले असतील पण हा परवाचा फोटो तुमची ढेरी दाखवतो.. हा हा.. असा खोचक टोला आव्हाड यांनी लगावला. त्यांच्या या ट्विटची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अजित पवार गटाकडून यावर जोरदार प्रत्युत्तर दिले गेले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube