मुंडे भावा-बहिणीचे मनोमीलन झाले… पण पंकजांसाठीचा रोडमॅप भाजपने आधीच ठरवलाय!

  • Written By: Published:
मुंडे भावा-बहिणीचे मनोमीलन झाले… पण पंकजांसाठीचा रोडमॅप भाजपने आधीच ठरवलाय!

पुणे : पंकजा आणि धनंजय मुंडे (Pankaja Munde) या भावाबहिणीचा राजकीय संघर्ष साऱ्या महाराष्ट्राने पाहिला. बीडमध्ये (Beed) तर या संघर्षाची धार इतकी होती की अनेक गावांत उभे दोन गट पडले होते. एकमेकांना राजकीयदृष्ट्या संपविण्याची एकही संधी दोघेजण सोडत नव्हते. त्यांच्यातील अबोला देखील चर्चेचा विषय ठरला होता. भगवानगडावर पंकजांना मेळावा घेण्यापासून रोखण्यापर्यंत ते त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव करण्यापर्यंत धनंजय यांनी खेळ्या खेळल्या. चिक्कीताई म्हणून पंकजांची बदनामी करण्यातही धनंजय आघाडीवर होते. मात्र जसे अजित पवार हे शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचा एक गट घेऊन सत्तेत सहभागी झाले तसे या दोघा बहीणभावांचे संबंध बदलू लागले आहेत. त्याचाच प्रत्यय येथील परळी येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमात आला. दोघांनीही या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरूीन एकमेकांची स्तुती केली. बीडच्या विकासासाठी एकत्र काम करण्याचा जणू काही शब्दच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोघांच्या मनोमीलनाला जाहीर पाठिंबा देत तुम्ही असेच एकत्र राहा. आमची ताकद वाढवा. त्यातच महाराष्ट्राचे आणि बीडचे हित असल्याचे सांगितले.

Devendra Fadanvis : एकाच व्यासपीठावर राहा, आम्ही तुमच्या पाठीशी; फडणवीसांचा मुंडे बंधु-भगिनीला सल्ला

आता या दोघा बहीण-भावांच्या मनोमीलनाचे परिणाम काय आणि त्यांची पुढील राजकीय वाटचाल कशी असेल, याची उत्सुकता आहे.

पंकजा या सध्या राजकीयदृष्ट्या संकटात आहेत. वैयक्तिक पातळ्यांवर देखील त्यांना अनेक अडचणींचा त्यांना सामना करावा लागतो आहे. भावाची साथ मिळाल्याने आणि बीडमधील राजकीय संघर्ष मिटल्याने त्यांना थोडासा दिलासा मिळेल.  त्यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत आहे. सतत राजकारणात व्यग्र राहिल्याने त्यांना हा कारखाना व्यवस्थित चालवता आला नाही. आता महायुतीचे सरकार आल्याने त्यांना यातून काही मार्ग काढता येईल. धनंजय हे त्यात आता अडचण ठरणार नाहीत.

पंकजांचे राजकीय पुनर्वसन कसे होणार? 

परळीच्या पहिल्या महिला आमदार म्हणून त्यांनी २००९ मध्ये विधानसभेत एंट्री केली होती. पुढे २०१९ मध्ये धनंजय यांनी त्यांचा पराभव केला. नगर परिषद, जिल्हा परिषद, येथूनही धनंजय यांनी त्यांना सत्तेबाहेर फेकले. आता धनंजय हे परळीतून पुन्हा महायुतीचे उमेदवार म्हणून पुढे येतील. पंकजा या विरोधात उभ्या राहणार नसल्या तर धनंजय यांच्यासाठी ही लढत सोपी जाईल. त्या आधी लोकसभेच्या निवडणुका आहेत. पंकजा या बीडच्या खासदार होऊ शकतात, असे मत मांडण्यात येते. मात्र आपण बहीण प्रीतम यांना  दूर करून स्वतः खासदार होणार नसल्याचे पंकजा यांनी आधीच स्पष्ट केले आहे. मात्र भाजप श्रेष्ठींनी सांगितले तर त्यांना लोकसभेची निवडणूक बीडमधून लढवावी लागेल.

प्रीतम मुंडे यांनाच पुन्हा बीडमधून लोकसभेची उमेदवारी मिळाली तर पंकजांना विधानसभा किंवा विधान परिषद हेच पर्याय शिल्लक राहतात. यामुळेच आपल्या शिवशक्ती यात्रेच्या निमित्ताने मतदारसंघाची चाचपणी केल्याचे बोलले जाते. अनेकांच्या म्हणण्यानुसार पाथर्डी किंवा गंगाखेड हे दोन मतदारसंघ त्यांच्यासाठी अनुकूल ठरू शकतात. पंकजा आणि धनंजय हे एकत्र राहिले तर बीडमधील आष्टी विधानसभा मतदारसंघही पंकजा यांच्यासाठी सुरक्षित राहू शकतो. पण तेथे सध्या राष्ट्रवादीचे आमदार असल्याने ते हा मतदारसंघ पंकजांसाठी सोडणार का, हा प्रश्नच आहे.

याबाबत बीड येथील सकाळचे ज्येष्ठ पत्रकार दत्ता देशमुख म्हणाले की पंतजा यांच्याबद्दल राज्यातील भाजप नेत्यांची काय मते आहेत, हे  लपून राहिलेले नाही. त्यांना राज्याच्या राजकारणात ठेवण्यात भाजपला स्वारस्य नसल्याचे दिसून आले नाही. त्यांना ओबीसींच्या मेळाव्याला पक्षाने जाऊ दिले नसल्याचे त्यांनीच सांगितले होते.  याचाच अर्थ त्यांनी राज्याच्या राजकारणात फार सक्रिय राहू नये, अशीच येथील नेत्यांची भावना आहे. त्यामुळे त्यांना लोकसभेचा पर्याय निवडण्याशिवाय मार्ग नाही. धनंजय यांचा परळीतून मार्ग निर्धोक होत असेल तर त्यांनाही याबाबत आक्षेप असण्याचे कारण नाही.  त्यामुळे पंकजांसाठी इतर विधानसभा मतदारसंघातून निमंत्रणे येत असली तरी लोकसभेची तयारी करण्याची वेळ येण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube