माजी मंत्र्यांच्या कुटुंबातील 5 जण झेडपीच्या रिंगणात; तिघे जण भाजपकडून, मुलगी ‘मशाल’ तर पुतण्या काँग्रेसचा उमेदवार

Parbhani ZP Election 2026: माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपूडकर यांच्या कुटुंबातील पाच जण निवडणुकीचा रिंगणात उतरलेत.

  • Written By: Published:
Suresh Warpudkar Family

Parbhani ZP Election 2026: नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकांमध्ये घराणेशाहीचे अनेक उदाहरणे आपण पाहिलेत. आमदार, खासदारांची मुले, मुली, पत्नी व इतर नातेवाईक रिंगणात उतरले होते. त्यातील काही जणांना मतदारांनी स्वीकारले. तर काही जणांना मतदारांनी घरचा रस्ता दाखविलीय. आता बारा जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक होत आहे. त्यातही सर्वच जिल्ह्यांमध्ये घराणेशाही दिसून येत आहे. काही आमदारांनी पत्नी, मुलगा, सून, मुलीला निवडणुकीच्या आखाड्यात उतरविलंय. परभणीमध्ये तर अजब प्रकार घडलाय. कारण माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेश वरपूडकर (Suresh Warpudkar) यांच्या कुटुंबातील दोन-तीन नाहीतर तब्बल पाच जण निवडणुकीचा रिंगणात उतरलेत. तेही वेगवेगळ्या पक्षाकडून. वरपूडकर यांच्या घरातील पाच उमेदवार कोण, कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळालीय, तेच जाणून घेऊया…


कोण आहेत सुरेश वरपूडकर ?

सुरेश वरपूडकर (Suresh Warpudkar) हे गेल्या चार दशकांपासून राजकारणात असून, परभणी जिल्ह्यातील मोठे राजकीय नेते आहेत. ते सिंगनापूर, पाथरी विधानसभा मतदारसंघातून तब्बल पाच वेळा आमदार राहिलेले आहेत. तर परभणी लोकसभा मतदारसंघातून ते खासदार राहिलेले आहेत. काँग्रेसकडून ते सहा महिन्यांसाठी राज्यमंत्री राहिलेले आहेत. परंतु 2009 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकीत वरपुडकरांना मतदारांनी नाकारले होते. 2019 ला पाथरी विधानसभा मतदारसंघातून ते पुन्हा विधानसभेत गेले होते. परंतु 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. गेल्याच वर्षी ते भाजपमध्ये दाखल झालेत. आता ते पुन्हा चर्चेत आले ते जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे कारण त्यांच्या घरातील पाच जणांना जिल्हा परिषदेचे तिकीट मिळालय. भाजपकडून (BJP) वरपूडकर यांचा मुलगा, सून आणि पुतण्याला तिकीट मिळालंय. तर उबाठा शिवसेनेकडून मुलगी, तर काँग्रेसकडून एका पुतण्याला तिकीट मिळालंय.


कोण-कोणत्या जिल्हा परिषद गटातून रिंगणात ?

सुरेश वरपुडकर यांचे चिरंजीव समशेर वरपुडकर हे सिंगणापूर जिल्हा परिषद गटातून भाजपकडून निवडणूक लढवयात. तर त्यांची पत्नी प्रेरणा वरपुडकर या दैठणा गटातून भाजपच्या उमेदवार आहेत. तर वरपुडकर यांचे पुतणे बोनी वरपुडकर हे लोहगाव गटातून रिंगणात उतरले आहे. त्यांनाही भाजपने तिकीट दिलंय. तर सुरेश वरपूडकर यांच्या कन्या सोनल देशमुख या झरी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवतायत. त्यांना उबाठा गटाकडून उमेदवारी मिळालाय. त्यांचा आमदार राहुल पाटील यांच्या उपस्थित पक्ष प्रवेश झालाय.


पुतण्या काँग्रेसकडून लढतोय

सुरेश वरपूडकर यांचे दुसरे पुतणे अजित वरपूडकर हेही राजकारणात नशिब अजमावतायत. ते काँग्रेसच्या तिकीटावर लोहगाव गटातून निवडणूक लढवतायत. अजित वरपूडकर यांचे वडिल विजय वरपूडकर आणि माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्यामध्ये तीव्र मतभेद होते. परंतु जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत वरपूडकर यांच्या कुटुंबात समेट झाल्याचे बोलले जात आहे.


महानगरपालिकेत पत्नी नगरसेवक, पण भाजपला अपयश

महानगरपालिका निवडणुकीत भाजपकडून परभणीची जबाबदारी माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्यावर होती. परंतु त्यांना महानगरपालिका निवडणुकीत खास काही करता आले नाही. येथे उबाठा शिवसेनेने सत्ता मिळवलीय. भाजपला येथे यश आले नसले तर सुरेश वरपूडकर यांच्या पत्नी मीनाताई वरपूडकर या नगरसेवक निवडून आलेल्या आहेत. त्या परभणीच्या महापौरही राहिलेल्या आहेत. त्यांच्या पत्नी भाजपच्या नगरसेवक असताना भाजपकडून जिल्हा परिषदेला तीन तिकीटे वरपूडकरांच्या घरात देण्यात आलेत. एकीकडे घराणेशाहीला थारा देणार नाही, असे भाजपचे नेते म्हणतात. प्रत्यक्षात एकाच घरात तिघांना उमेदवारी दिलीय जातेय, हा विषय सोशल जोरदार चर्चेला जात आहे.

follow us