Rajan Patil यांचा भाजप प्रवेश अखेर ठरला? या आमदाराचा गौप्यस्फोट
सोलापूर : मला सध्या कोणत्याही पदाची अपेक्षा नाही. मला माझ्या पक्षाने खूप काही दिले. माझ्या शेतकऱ्यांची दोन कामे आहेत. अनगर आणि १० गावे उपसा सिंचन योजना व सीना- भोगावती जोड कालवा या योजनेविषयी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या बरोबर मी स्वतः, आमदार यशवंत माने (Yashwanat Mane), आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti), आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut) व अन्य दोन आमदार यांची चर्चा झाली आहे. त्यांनी मला या २ योजना पूर्णत्वास नेण्याविषयी आणि निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात आश्वासित केले. जो कोणी माझ्या शेतकऱ्यांची ही दोन कामे करणार, त्यांच्याबरोबर मी जाणार, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) यांनी केला.
मागील काही महिन्यांपासून माजी आमदार पाटील भाजपात जाणार, अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली. आता गेल्या १५ दिवसांपासून राजन पाटील हे येत्या १९ फेब्रुवारी दिवशी भाजपात प्रवेश करणार, अशी चर्चा सध्या पुन्हा रंगात आहे. लोकनेते बाबूराव पाटील यांची १९ फेब्रुवारी रोजी पुण्यतिथी आहे, तर छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. या संदर्भात त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी वरील माहिती दिली. या सर्व घडामोडींमुळे माजी आमदार पाटील भाजपात जाणार, या चर्चेला उधाण आले आहे.
६ फेब्रुवारी रोजी मोहोळ तालुक्यातील १० गावांच्या ग्रामपंचायतीचे ठराव जलसंपदा विभागाचे कार्यालय असलेल्या सिंचन भवन येथे दाखल केल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे आता या योजनेच्या सर्व्हेचा मार्ग मोकळा झाला. माजी आमदार राजन पाटील व आमदार यशवंत माने यांच्या प्रयत्नात अनगर आणि परिसरातील १० गावांच्या शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी निकालात काढण्यासाठी अनगर आणि १० गावे उपसा सिंचन योजना ही महत्वाकांक्षी योजना तयार करण्यात आली. ही योजना कार्यान्वीत झाल्यानंतर १० गावांतील सुमारे २५ हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याची माहिती माजी आमदार पाटील यांनी दिली.