पटोले-थोरात वादाची हायकमांडकडून दखल, प्रभारी पाटील १२ तारखेला मुंबई दौऱ्यावर

  • Written By: Published:
पटोले-थोरात वादाची हायकमांडकडून दखल, प्रभारी पाटील १२ तारखेला मुंबई दौऱ्यावर

मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठं राजकारण रंगलं होतं. नाशिक पदवीधर विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांची निष्क्रियता तसंच पक्ष आणि तांबे कुटुंबात समन्वय घवडून आणण्यात अपयश आल्यामुळे थोरातांनी आपल्या विधिमंडळ पक्षनेतेपदाचा (Legislature Party Leader) राजीनामा दिला. त्यामुळं पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. असं असतानाच त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिलं होतं. नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून सुरु झालेला हा वाद आता काँग्रेस फुटीवर येऊन पोहोचला आहे. आधीच महाराष्ट्रात पक्ष कमकुवत झाला आहे. त्याला बळ देण्याऐवजी नेतेच वादात गुरफटले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद मिटवण्यासाठी हायकमांडने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील (H. K. Patil) १२ फेब्रुवारी रोजी मुंबई दौऱ्यावर येत आहेत.

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काम करणे अशक्य असून आपण विधिमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र बाळासाहेब थोरात यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठवले आहे. पटोले आणि थोरात यांच्यातील वाद विकोपाला गेला आहे. या अंतर्गत धुसफुसीची गंभीर दखल दिल्ली हायकमांडने घेतली. हा महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद मिटवण्यासाठी प्रभारी एच. के. पाटील मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. या मुंबई दौऱ्यात ते महाराष्ट्रातील नेत्यांसमवेत चर्चा करणार आहेत.

Radhakrishna Vikhe आता वाळू लिलाव कायमस्वरूपी बंद होणार! महसूल मंत्रांची घोषणा 

मुंबई दौऱ्यावर एच. के. पाटील बाळासाहेब थोरातांची भेट घेणार आहेत. १२ तारखेला ‘हात से हात जोडो’ या अभियानाचा आढावा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि त्यानंतर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि कार्याध्यक्ष चरणसिंह सप्रा यांच्याकडून घेणार आहेत. तर संध्याकाळी राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीला अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, सुनील केदार, विजय वड्डेटीवार, सतेज पाटील, विश्वजित कदम हे नेते हजर राहणार आहेत.

दरम्यान, पाटील यांच्या १२ तारखेच्या कार्यक्रमात बाळासाहेब थोरात यांचा उल्लेख विधिमंडळ पक्षनेते असाच करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिल्याची जी चर्चा आहे, त्याबाबत काँग्रेसकडून कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे दिसते. थोरातांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न प्रभारी पाटील या भेटीत करणार अल्सयाचे समजते. त्यासाठी ते थोरात आणि नंतर ज्येष्ठ नेत्यांबरोबर चर्चा करणार आहेत. त्यानंतर पटोले-थोरात यांच्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube