Girish Mahajan : लोक संजय राऊतांकडे जोकर म्हणून बघतात

Girish Mahajan : लोक संजय राऊतांकडे जोकर म्हणून बघतात

मुंबई : ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून मारहाण केल्यानंतर ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जोरदार समाचार घेतला होता. आपल्याला काडतूस मुख्यमंत्री मिळाला अशा शब्दात त्यांनी टीका केली होती. त्यानंतर फडणवीसांनी देखील मी फडतूस नाही, काडतूस आहे, अशा शब्दात ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर खा. संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फडणवीसांवर निशाना साधला होता. भ्रष्टाचाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून फडणवीस बसलेत, अशी टीका केली होती. दरम्यान, आता भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी राऊतांवर टीका केली. लोकं संजय राऊतांकडे फक्त जोकर म्हणून बघतात, असं महाजन म्हणाले.

ठाण्यातील रोशनी शिंदे मारहाण प्रकारानंतर मारेकऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नाही. तर उलट रोशनी शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळं संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर मोठा आरोप केला होता. फडणवीस यांच्यावर टीका करतांना राऊतांनी फडणवीस हे भ्रष्टाचाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत, हे भिजलेलं काडतूस असून यांनी त्यांची आई बदललली आहे. बेईमान लोकांना मंत्री बनवण्याची भाजपला सवय आहे, अशी टीका त्यांनी केली होती. दरम्यान, आज जळगाव दौऱ्यावर असतांना मंत्री गिरीश महाजन यांनी राऊतांवर विखारी टीका केली. ते म्हणाले की, संजय राऊतांना आता बोलायला काही ताल राहीला नाही, त्यांच्या बोलण्याला कोणतीही सीमा उरली नाही. दररोज सकाळी उठून काहीही बरळायचं हा त्यांचा आता उद्योग झाला आहे. ते म्हणतात की, फडणवीस हे भ्रष्टाचाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. पण, संजयजी, स्वत: आपण कुणाच्या मांडीला मांडी लावून बसला आहात, असा सवाल महाजन यांनी केला.

फडणविसांनी ठाकरेंवर भावासारखं प्रेम केलं : बावनकुळे असं का म्हणाले? 

ते म्हणाले, संजयजी, तुम्ही कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसला आहात, राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलात आहात. ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत, ते नवाब मलिक, अनिक देशमुख कुठं आहेत… मला कितीतरी लोकांची नावे सांगता येतील, संजय राऊतजी, आपण बोलतांना विचार करू बोलावं, एवढाच सल्ला मी देईल. पण त्यांचा आणि विचारांचा काहीच संबंध नाही. तोंडात येईल तसं ते बोलत राहतात. ते काहीही बोलत असतात. लोक फक्त करणूक म्हणून त्यांचे ऐकतात. त्यामुळं आता जनतेचा देखील त्यांच्यावर विश्वास राहिला नाही. लोक फक्त त्यांना जोकर म्हणून बघत असते, अशी टीका त्यांनी केली आहे.

उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर केलेल्या फडतूस गृहमंत्री या टीकेनंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. ठाकरेंच्या टीकेनंतर फडवीसांनीही जोरदार पटलवार केला होता. त्यानंतर दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच महाजन यांनी संजय राऊतांचा जोकर असा उल्लेख केला असून आता संजय राऊत याला नेमकं काय उत्तर देतात, हेच पाहणं महत्वाचं आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube