मोदींसाठी दोवोस दौरा अर्धवट सोडणाऱ्या मुख्यमंत्र्यांना संजय राऊतांनी सुनावलं

मोदींसाठी दोवोस दौरा अर्धवट सोडणाऱ्या मुख्यमंत्र्यांना संजय राऊतांनी सुनावलं

मुंबई : राज्यातील सत्तांतरानंतर अनेक उद्योग गुजरातला गेल्यानं विरोधकांनी सरकारविरोधात आवाज उचलला होता. राज्यातून गेलेली गुंतवणूक चर्चेचा विषय बनलाय. आता 16 जानेवारीपासून दावोस येथे आंतरराष्ट्रीय आर्थिक परिषद होतेय. या परिषदेला देशातील सर्वच राज्यांचे प्रमुख गुंतवणूक आणण्यासाठी जाताहेत. 19 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी येताहेत. त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोसचा दौरा अर्ध्यातच सोडून येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी गंभीर नाहीत, अशी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

खासदार राऊत येत्या 20 जानेवारीला जम्मू-काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आपण स्वत: भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचं आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल माहिती दिली. राऊत म्हणाले की, राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेत आत्तापर्यंत चार हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलाय. द्वेष सोडून लोकांना प्रेमाचा संदेश देणाऱ्या यात्रेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वागत करायला पाहिजे, असंही संजय राऊत यांनी सांगितलंय.

राऊत म्हणाले की, नेहरु-गांधी कुटुंबातील एक युवक संपूर्ण देशाच्या एकजूटीसाठी, देशातील द्वेषाचं वातावरण घालवण्यासाठी भारत जोडो यात्रा करत आहे. हजारो लोक या यात्रेत सहभागी होताहेत. त्यामुळं खरं तर या यात्रेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत करायला हवं, असंही ते म्हणाले. राहुल गांधींची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आली तेव्हा ठाकरे गटाकडून आदित्य ठाकरे यात्रेत सहभागी झाले. यात्रेचा शेवटचा टप्पा जम्मू-काश्मिरमध्ये आहे. देशासाठी हा भाग अतिशय संवेदनशील आहे. या भूभागाशी बाळासाहेब ठाकरे यांचं भावनिक नातं होतं. या नात्यानं शिवसेनेकडून मी येत्या 20 तारखेला जम्मू-काश्मिरात भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या मध्यरात्री वर्षा निवासस्थानी गुप्त बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये अडीच तास खलबतं झाली. शिंदे गटासोबत युती करण्याच्या अनुषंगानं या बैठकीत चर्चा झाल्याचं सांगितलं जातंय. शिंदे-आंबेडकर भेटीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया दिलीय. त्यात छुपं काय असतं? असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. मी दिल्लीत होतो. प्रकाश आंबेडकर यांची माझीही भेट झाली. त्यात छुपं काय? प्रकाश आंबेडकर शिंदेंना भेटले त्यात छुपं काय? तुम्हाला भेटीबाबत कळलं म्हणजे त्यात लपून काय आहे? तुम्हाला त्या भेटीची माहिती मिळाली, याचाच अर्थ ती भेट गुप्त नव्हती, असं संजय राऊत म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube