‘बघेल सरकारचं बिंग फुटलं, महादेव अॅपच्या माध्यमातून आलेले पैसै निवडणुकीसाठी…’; दरेकरांचा हल्लाबोल
Pravin Darekar on Bhupesh Baghel : छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांच्याबाबत ईडीने मोठा खळबळजनक दावा केला. महादेव बेटिंग अॅपच्या प्रवर्तकांनी बघेल यांना ५०८ कोटी रुपये दिल्याचे ईडीने सांगितलं. दरम्यान, ईडीच्या दाव्यानंतर निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण चांगलचं तापलं. ईडीच्या दाव्यानंतर भाजप नेत्यांकडून कॉंग्रेस आणि बघेल यांच्यावर जोरदार टीका करण्यात येत आहे. आता भाजप आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनीही यावर भाष्य केलं.
‘नगरमध्ये दुष्काळ जाहीर न करणं हे तर…’ : विखे-पाटलांच्या मुख्यमंत्रीपदावरुन रोहित पवारांना संशय
आज माध्यमांशी बोलतांना दरेकर यांनी कॉंग्रेसवर निशाणा साधला. ते म्हणाले की, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना महादेव अॅपच्या माध्यमातून पाचशे आठ कोटी रुपये मिळाल्याचं समोर आल. विकासाचा दावा करणारं कॉंग्रेस सत्तेमध्येच मग्न होतं. महादेव अॅपच्या माध्यमातून आलेले हे पैसै निवडणुकीसाठी वापरले जाणार होते. त्यामुळं कॉंग्रेसचा विकासाचा खोटा बुरखा टराटरा फाटल्या गेला, असं दरेकर म्हणाले.
ते म्हणाले, काल ईडीला गुप्त माहिती मिळाली होती की, महादेव अॅपच्या माध्यमातून मोठी रक्कम छत्तीसगडमध्ये हलवली जातआहे. त्या माहितीच्या आधारे ईडीने कारवाई केली असता मोठी रक्कम समोर आली. असीम दास याला ईडीने अटक केली. त्याच्याकडून पाच कोटी ३९ लाख रुपये जप्त केलं. महादेव अॅपच्या प्रवर्तकांनी बघेल यांना पैसे पाठवले होते, अशी कबुलीही त्याने देली. शिवाय, ईडीने महादेव अॅपची बोगस खातीही शोधून त्यातली १५ कोटीहून अधिक रक्कम गोठवली आहे.
या प्रकरणात ई़डीने चार जणांना अटक केली असून चौदा जणांवर गुन्हे दाखल केले असल्याचं दरेकर म्हणाले.
कॉंग्रेस नेते हवालाच्या पैशातून आपली घरं भरत आहेत. कॉंग्रेस छत्तीसगडला लुटत आहे. असीम दासच्या माध्यमातून कॉंग्रेस नेत्यांना पैसे पाठवले जात होते का? बघेल यांनी पैसे देण्याचे आदेश दिले होते का? कॉंग्रेस नेत्यांचा आणि परदेशात बसलेल्या घोटाळेबाजांचा काय संबंध आहे? असा सवाल करत बघेल सरकारचं बिंग फुटलं…. त्यामुळं ईडीने या प्रकरणी संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी, असं दरेकर म्हणाले.
दरम्यान, ईडीने आरोप केल्यानंतर बघेल यांनी यावर खुलासा करत ईडीचा दावा फेटाळला आहे. बघेल यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली. त्यात ते म्हणाले की, भाजपला छत्तीसगडमध्ये ईडी, आयटी, डीआरआय आणि सीबीआयसारख्या संस्थांच्या मदतीने निवडणूक लढवायची आहे. निवडणुकीपूर्वी माझी प्रतिमा डागाळण्याचा हा हीन प्रयत्न आहे. महादेव अॅपचा कथित तपास करण्याच्या नावावर ईडीने आधी माझ्या निकटवर्तीयांना बदनाम करण्यासाठी त्यांच्या घरावर छापे टाकले आणि आता एक अज्ञात व्यक्तीच्या जबाबाबच्या आधारे माझ्यावर 508 कोटी रुपये घेण्याचा प्रयत्न केला.