ओमराजेंच्या विरोधात माजी IAS अधिकारी? भाजपच्या डोक्यात लातूर भुकंपातील ‘हिरोचे’ नाव
सगळं नुकसान झालं होतं… निसर्गाची अवकृपा झाली होती… प्रेतांचा खच पडला होता… 1933 सालच्या भूकंपानंतर लातूर-धाराशिवमधील अनेक घरांत दिवा लावायलाही माणूस शिल्लक राहिला नव्हता. जवळपास 52 गावं जमिनदोस्त झाली होती. पण या 52 गावांना पुन्हा उभे करण्यात त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी जेवढी तत्परता, शिताफी दाखवली होती तेवढीच किंबहुना त्यापेक्षा कैक पटीने जास्त कष्ट आणखी एका माणसाने उपसले होते.
हा माणूस स्वतः उपाशी राहिला होता पण इतरांच्या पोटाला कसे मिळेल याची तजबीज केली. स्वतः बैलगाडीत झोपला, पण घर पडलेल्यांच्या डोक्यावर कसं छप्पर येईल हे बघितले. आजही माणसं सांगतात जर हा माणूस नसता तर कदाचित 52 गावांच्या पुनर्वसनाचा पूर्णपणे नास झाला असता. थोडक्यात काय तर या माणसाणं किल्लारीचं संकट धीरोदात्तपणे पेलेलं होतंच पण तितक्याच ताकतीनं त्यांनी पुनर्वसन सुद्धा केलं होतं..
या माणसाचे नाव प्रविणसिंह परदेशी. (Pravin Singh Pardeshi)
परदेशी त्यावेळी तिथले जिल्हाधिकारी होती. परदेशी यांनी त्यावेळी केलेले काम हे आजही एक रोल मॉडेल म्हणून देशभरात वापरले जाते. याचमुळे आज 30 वर्षांनंतरही या भूकंपग्रस्त भागात फिरताना खेडवळ भागात या IAS अधिकाऱ्यांचे नाव अनेक लोक घेत असतात हे विशेष… आत 30 वर्षानंतर हा भूकंपातील हिरो धाराशिव लोकसभेच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा आहेत. नेमक्या का होत आहेत या चर्चा? पाहुया. (Pravin Singh Pardeshi is likely to contest from Dharashiv Lok Sabha constituency from BJP)
राज्यसभा, ईडी चौकशी की झिशानचे फ्युचर? बाबा सिद्दकींनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्यामागे काय कारण?
भाजपने देशभरातील 50 माजी IAS आणि IPS अधिकाऱ्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविण्याची तयारी केली आहे. यात महाराष्ट्र केडरच्या माजी IPS अधिकारी परमबीर सिंग, माजी IAS अधिकारी प्रवीणसिंह परदेशी आणि राधेश्याम मोपलवार यांच्या नावाची चर्चा आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि बीएल संतोष यांनी गत जून महिन्यात देशव्यापी दौरा करुन कोण अधिकारी भाजपच्या साच्यात बसू शकतात आणि निवडून येऊ शकतात याचा आढावा घेतला होता.
प्रविणसिंह परदेशी हे मुळचे मराठवाड्याचे नसले तरीही त्यांना आजही इथले लोक हिरो मानतात. शिवाय त्यांना या भागातील खडा न् खडा माहितीही आहे. त्यांच्याबद्दलच्या या जनभावनेचा आणि त्यांच्या अनुभवाचा उपयोग आगामी लोकसभेसाठी करण्याच्या विचारात भाजप आहे. भाजपचे नेते राणा जगजीतसिंह पाटील हे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक नाहीत. तर शिंदे गटाकडून रवींद्र गायकवाड इच्छुक आहेत. मात्र त्यांची ताकद काहीशी मर्यादित स्वरुपाची झाल्यामुळे त्यांचे नाव मागे पडण्याची शक्यता आहे. यातूनच प्रविणसिंह परदेशी यांचे नाव पुढे येत आहे. अनेक बड्या नेत्यांमार्फत परदेशी हे उमेदवार असतील असा निरोप दिला आहे.
प्रतापराव जाधवांच्या विरोधात ठाकरेंचा उमेदवार ठरला, नरेंद्र खेडेकरांच्या नावावर शिक्कामोर्तब
महाविकास आघाडीत सध्या हा मतदारसंघ उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या ताब्यात आहे. मागील पाच वर्षांच्या काळात राजेनिंबाळकरांनी मतदारसंघातील संपर्क आणि वावर यामुळे स्वतःचा एक वेगळा प्रभाव निर्माण केला आहे. याशिवाय ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिल्याने त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाऊ लागले आहे. यापूर्वीपर्यंत धाराशिव मतदारसंघ राज्यात तसा फारसा चर्चेत नसायचा. पण 2019 पासून त्यांच्यामुळे या मतदारसंघाची चर्चा राज्यात होऊ लागली आहे. पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ आता ठाकरेंनी आतापर्यंत चांगल्यारितीने बांधून ठेवला आहे.
याचमुळे ठाकरे आणि राजेनिंबाळकर यांचा हा प्रभाव प्रभाव मोडून काढण्यात त्याच ताकदीचा आणि तेवढ्या प्रभावाचा उमेदवार द्यावा लागणार आहे. यातूनच परदेशी यांच्याबद्दलची जनभावना असली तरीही भाजपनेही सध्या परदेशी यांच्या नावाचे सर्वेक्षण सुरु केले आहे. ते ओमराजेंसारख्या कट्टर राजकारण्याला लढत देऊ शकतील का याचा अंदाज भाजपचे नेते घेत आहेत. त्यामुळे आता परदेशी यांना अचानकपणे रिंगणात उतरवल्यानंतर ते कशी लढत देतील याचीच उत्सुकताच आगामी काळात राहणार आहे.