Boycott Bollywood : पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य, बॉयकॉट बॉलिवूड थांबणार ?
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडीयावर बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंड चालवला जातोय. याचा मोठा फटका देखील बॉलिवूडच्या चित्रपटांना बसला आहे. तर आता सुपरस्टार शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘पठाण’ बाबत देखील वाद निर्माण झाला आहे. भाजप नेते नरोत्तम मिश्रा यांनी या चित्रपटातील गाणे आणि दीपिका पादुकोणची भगवी बिकिनी वादग्रस्त असल्याचं म्हटलं होत.
मात्र आता पठाण चित्रपट रिलीज होण्याच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांना चित्रपटांवर बोलण्याबाबत सल्ला दिला आहे. त्यामुळे आता बॉयकॉट बॉलिवूड हा ट्रेंड कमी होणार का ? त्याचा सुपरस्टार शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘पठाण’ ला फायदा होणार का ? असे तर्क-वितर्क लावले जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी भाजप राष्ट्रीय कार्यकारणीच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांना मोठा सल्ला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘चित्रपटांसारख्या अर्थहीन विषयांवर अनावश्यक वक्तव्य करण्याची गरज नाही. तसेच या प्रकरणांध्ये होता होईल तेवढ सावध राहणं गरजेच आहे. अशा वक्तव्यांनी पक्षाच्या विकासाच्या अजेंड्याला फाटा दिला जातो.’
यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी चित्रपटांबाबत अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यामुळे बरेच वादही झाले आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या सल्ल्यानंतर बॉलीवूडच्या बॉयकॉट ट्रेंडमध्ये काही फरक पडेल का ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाबाबत देशातील विविध राज्यांमध्ये निदर्शने होत आहेत. त्यामुळे पठाणच्या सुटकेच्या दिवशी गदारोळ होण्याची शक्यता आहे. मात्र आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विधानानंतर गदारोळ होण्याची शक्यता बरीच कमी होण्याची शक्यता आहे. कारण त्यांच्या ताज्या विधानाचा परिणाम सर्वांवर दिसून येतो. तथापि, पीएम मोदींच्या या विधानानंतर, किसी का भाई किसी की जान, सेल्फी आणि जवान या आगामी बॉलीवूड चित्रपटांनाही बॉलीवूडच्या बहिष्काराच्या ट्रेंडपासून दिलासा मिळू शकतो.