‘सत्तेतले रेडे ज्ञानेशांकडून आपले वेद वदवतायत’; राज ठाकरेंनी भाजपसह ज्ञानेश कुमारांवर केला शाब्दिक हल्लाबोल!

Raj Thackeray On Gyanesh Kumar SIR: राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सत्ताधाऱ्यांवर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला आहे.

Raj Thackeray On Gyanesh Kumar SIR

Raj Thackeray On Gyanesh Kumar SIR: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सत्ताधाऱ्यांवर उपरोधिक शब्दांत निशाणा साधला आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली. त्यातून त्यांनी ज्ञानेश कुमार आणि भाजप यांच्यावर टीका केली.

सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद वदवतायत

राज ठाकरे पोस्टमध्ये म्हणाले, “ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवले होते. आता सत्तेतले रेडे या ज्ञानेशाकडून आपले वेद वदवतायत,” असं म्हणत राज ठाकरे यांनी ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर टीका केली.

गेल्या दोन दिवसांपासून ज्ञानेश कुमार गप्प असल्याचं म्हणत त्यांना बोलतं करणारेही कुठे दिसत नसल्याचं राज ठाकरे यांनी पोस्टमध्ये नमूद केलं. ज्ञानेश कुमार यांच्यासारख्या व्यक्तींना हाताशी धरून भाजप सत्तेचा अमरपट्टा घेऊन आल्याचं सांगत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘SIR हे सत्तेचं नवं अस्त्र’

राज ठाकरे यांनी 2025 पासून SIR हे नवं अस्त्र म्हणून वापरलं जात असल्याचा दावा केला. SIRमध्ये घोळ झाल्याचं म्हणत त्यांनी या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. निवडणूक आयुक्तांच्या वक्तव्यांचा संदर्भ देत ही प्रक्रिया रद्द करून त्यातील कथित घोळांची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

‘SIR रद्द करा, नव्याने प्रक्रिया राबवा’

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका स्पष्ट करताना राज ठाकरे यांनी सध्याची SIR प्रक्रिया पूर्णपणे रद्द करण्याची मागणी केली. त्यातील कथित अनियमिततेची निष्पक्ष चौकशी करून नव्याने SIR प्रक्रिया राबवावी, असं त्यांनी म्हटलं. यासाठी देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

‘EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या’

यापुढील सर्व निवडणुका व्होटींग मशीनवर न घेता पुन्हा बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणीही राज ठाकरे यांनी केली. यासाठी सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन मोठं आंदोलन उभं करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं. “तरच इतक्या वर्षांचं सत्तेचं सत्य बाहेर येईल,” असं म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टचा शेवट केला.

 

follow us