Rohit Pawar : ‘ते उत्साही कार्यकर्त्यांचे प्रेम’, जयंत पाटलांच्या भावी मुख्यमंत्री बॅनरवर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Rohit Pawar :  ‘ते उत्साही कार्यकर्त्यांचे प्रेम’, जयंत पाटलांच्या भावी मुख्यमंत्री बॅनरवर रोहित पवारांची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसचे ( NCP )  प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ( Jayant Patil )  यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या काही कार्यकर्त्यांनी जयंत पाटलांना बॅनर लावून शुभेच्छा दिल्या आहेत. पण हे बॅनर एका विशेष कारणामुळे चर्चेत आले आहे. या बॅनरवर जयंत पाटील यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करण्यात आला आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरु झाली आहे . कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी अजित पवारांना 2024 साली मुख्यमंत्री करायचे, असे विधान केले आहे. या बॅनरवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आमदार रोहित पवार ( Rohit Pawar )  यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कार्यकर्त्यांचे प्रेम आपापल्या नेत्यांवर असते. होर्डिंग लावणारा कार्यकर्ता हा कुणाला नेता मानतो, यावर ते अवलंबून असते. याबाबत त्या नेत्याची काहीही चूक नसते, असे प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे. तसेच नेत्याने कुणालाही काही सांगितलेले नसते. भावनिक कार्यकर्ता कधी काय करेल, याबाबत कुणीही काही सांगू शकत नाही. त्यामुळे नेते ज्यावेळेला सांगतील तेव्हाच आपण विश्वास ठेवायला पाहिजे. सर्वच नेते हे महत्वाचे नेते, त्यामुळे उगाच कोणीतरी होर्डिंग लावले आहेत, त्यामुळे आपण अशी चर्चा करु नये, असे  रोहित पवार म्हणाले आहेत.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मुख्यमंत्री पदाच्या नावावरुन अजित पवार यांचे नाव चर्चेत आहे. काही दिवसापूर्वी पुण्यातील एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी 2024 साली अजित पवारांना मुख्यमंत्री करणार असल्याचे बोलले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार हे जाहीर कार्यक्रमात अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजे हे बोलतात.

याउलट जयंत पाटील हे शरद पवारांचे अतिशय विश्वासू म्हणून ओळखले जातात. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्यांना यावेळी विरोधी पक्ष नेता व्हायचे होते, पण ती जागा अजित पवांरांनी घेतली अशी चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सुप्त संघर्ष  वर येताना दिसत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube