‘व्यक्ती को कुचल देनेसे विचार नही मरता…; संजय राऊतांच्या या ट्वीटमुळे खळबळ
मुंबई : राजापूरचे पत्रकार शशिकांत वारिशे (journalist shashikant warishe) यांच्या मृत्यूनंतर राज्यात खळबळ उडाली. वारिशे यांची हत्या करण्यात आली, असा दावा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. त्यांनी या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी करत उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना एक पत्र लिहिले आहे. यानंतर आता वारिशे यांच्या मृत्यूची एसआयटीमार्फत चौकशी केली जाणार आहे. दरम्यान या प्रकरणावर भाष्य करताना संजय राऊत यांनी उदय सामंत यांचा एक फोटो ट्वीट केल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण होत आहेत.
आता या फोटोविषयी संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले. उदय सामंत यांचा मी या मृत्यूप्रकरणाशी संबंध लावत नाहीये, असे संजय राऊत यावेळी म्हणाले. मी उदय सामंत यांचा या प्रकरणाशी संबंध लावत नाहीये. या निमित्ताने अनेक वेगवेगळे फोटो समोर आणले जातात. मात्र हा आरोपी किती चतूर आहे, असे मी म्हणत आहे. तो सध्या तुरुंगात आहे. मात्र त्याचे अनेक राजकीय लोकांबरोबर संबंध आहेत. राजकीय लोकांबरोबर फोटो काढणे आणि भ्रम निर्माण करणे, असे त्याच्याकडून केले गेले आहे. या प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात कोणाचाही दबाव नसावा, असे माझे स्पष्ट मत आहे.
जो भी हो बीजेपी का साथ छोड़ना, शिवसैनिकों और बाला साहेब जी के सिद्धांतों के साथ धोखा hail
— Amar Pandey🪷 🙏 (@Amar150847) February 11, 2023
राज्यात सध्याचे सरकार गुन्हेगारांना, भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालत आहेत, अशी टीका यावेळी संजय राऊत यांनी केली. शशिकांत वारिशे यांच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे. कारण या प्रकरणात काही स्थानिक नेत्यांचा जिल्हा स्ताराच्या पोलिसांवर दबाव राहू शकतो. नाणार रिफायनरी होऊ नये अशी आमची भूमिका होती. ती भूमिका मृत्यू झालेल्या पत्रकाराची देखील होती. प्रकल्प येणार आहे, म्हणून बाहेरच्या श्रीमंत लोकांनी त्या ठिकाणी जमिनी खरेदी केल्या होत्या. याविरोधात ते लढत होते. त्यांचा आवाज बंद होत नाही, हे समजल्यावर वारिशे यांची हत्या करण्यात आली. शशिकांत वारिशे यांची हत्या ही राजकीय हत्या आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.
संजय राऊत यांनी ट्वीट केलेल्या फोटोवर उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी स्पष्टीकरण दिले आहे. संजय राऊतांनी जो फोटो ट्वीट केला आहे तो जुना आहे. हा फोटो नाकारण्याचे काही कारण नाही. कारण मी मंत्री होऊन रत्नागिरीला गेलो होते. त्यावेळेस अनेक लोक आजूबाजूला येऊन फोटो काढत असतात. तसाच तो एक फोटो होता. तो फोटो काढला याचा अर्थ मी त्याला पाठबळ दिले असा त्याचा अर्थ होत नाही. कारण या व्यक्तीचे राज्यात अनेक नेत्यांबरोबर फोटो आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला देखील ते माहिती आहे. जो कोणी नेता त्याच्याबरोबर आहे, तो यामध्ये सामील आहे, असे घाणेरडे राजकारण करणे योग्य नाही असे मला वाटते, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.