तो आणि कुटुंब भ्रष्टाचारी, वडिलांच्या खूनामागे वेगळेच रहस्य; संजय राऊतांचा ओमराजे निंबाळकरांवर गंभीर आरोप
Sanjay Raut: पक्ष सोडून गेला, आता म्हणतो विकासासाठी गेला. काय विकास केला आहे. एक वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार आहे. या धाराशिवची दुबई केली का ?
Sanjay Raut On Omraje Nimbalkar: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या फुटीर खासदारांच्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. रविवारी सायंकाळी ठाकरे हे धाराशिवमध्ये होते. येथे शिवसैनिकांचा मेळावा झाला. या मेळाव्यात खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फुटीर खासदार ओमराजे निंबाळकरांवर (Omraje Nimbalkar) जोरदार हल्लाबोल केला आहे. ओमराजे निंबाळकर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहे. ईडीची चौकशी सुरू झाल्याने हा खासदार दुसऱ्या पक्षात पळून गेला आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
ओमराजे निंबाळकर शंभर कोटींना विकला गेला-संजय राऊत
राऊत म्हणाले, आता येताना रस्त्यात शिवसैनिकांचे चित्र पाहिले. उद्धवसाहेबांना सांगितले आहे. धाराशिवमध्ये ऑपरेशन तुडवा सुरू झालेले आहे. हे ऑपरेशन तुडवा धाराशिवमध्ये यशस्वी होणार आहे. कैलास पाटील यांनी सांगितलेले आहे, शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणार नाही. कैलास पाटील यांनी सांगितलेले आहे, शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही, असा निष्ठावंत आमदार शिवसेनेला मिळालेले आहे. हा जो गद्दार आहे, याला मी भामट्या आणि सोंगड्या म्हणतो. याने भामटेगिरी केली.
तो म्हणतो मी 2006 साली ग्रामपंचायतीचा सदस्य नव्हतो. तेव्हा अत्यंत कठीण परिस्थितीत मला उद्धव ठाकरे साहेबांनी माझा हात पकडला साथ दिला. एक वेळा आमदार केलं. दोन वेळा खासदार केले. मी पद आणि पैशासाठी कधी सोडणार नाही. म्हणाला आता काय केलंय, भामट्या. हा खासदार शंभर कोटीला विकला गेला, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
शिवसैनिकांच्या मारेकऱ्यांच्या गोटात जाऊन बसलात
7 मे 2024 ला भूममधील पाट सांगवी येथे शिवसैनिक समाधान पाटील यांची हत्या झाली. ही हत्या मतदान केंद्राबाहेर झाली आहे. ती हत्या शिंदेंच्या गुंडांना केली. आता हा खासदार मारेकऱ्यांचा गोटात जावून बसला आहे. त्याच्या आत्माला विचारलं का तुझी हत्या झाली. मी पक्ष सोडू का ? मारेकऱ्यांच्या गोटात सामील झाला. भामटा आणि सोंगड्या. याला आता धाराशिवच्या रस्त्यावर फिरू देऊ नका ? असे आवाहन राऊत यांनी केला आहे.
सगळ्यांची चौकशी लागल्यामुळे डरपोक आणि सोंगाडा पक्ष सोडून पळाला
पक्ष सोडून गेला, आता म्हणतो विकासासाठी गेला. काय विकास केला आहे. एक वेळा आमदार आणि दोन वेळा खासदार आहे. या धाराशिवची दुबई केली का ? तो का गेला ? त्याने बँकांमध्ये, पतसंस्थांमध्ये घोटाळे केले आहेत. तो आणि कुटुंबाने भ्रष्टाचार केला आहे. याच्या वडिलांच्या खूनामागे वेगळे रहस्य आहे. याने पवणराजे कंपनीच्या नावाने पाचशे कोटींचे प्लॉट धाराशिवमध्ये खरेदी केले आहेत. त्याची ईडीने चौकशी सुरू केलीय. वडिलांच्या नावाच्या मल्टिस्टेटमध्ये गरिबांचे बनावट खाते उघडून कोट्यवधी रुपयांचे गैरव्यवहार केला आहे. तेरणातील भंगार विकून पैसे खाल्ला आहे. या सगळ्यांची चौकशी लागल्यामुळे डरपोक आणि सोंगाडा पक्ष सोडून गेला आहे. मला वाटतं, आम्ही पंधरा-वीस वर्षे एका सापाला दूध पाजले, असे राऊत म्हणाले.