ठाकरे गटापुढं लवकरच The End चा बोर्ड; शिंदे गटाच्या आमदाराचा इशारा
Sanjay Shirsat : राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार (Ajit Pawar) गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला आणि त्यांना खातेवाटपही झालं. अजित पवार गटामुळं आपले मंत्रिपदे गेल्याची भावना शिंदे गटांच्या आमदारांमध्ये आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनाही आपलं मंत्रिपद गमवावं लागणार असून अजित पवार मुख्यमंत्री होतील, अशी चर्चा सुरू आहे. आज अजित पवारांचा वाढदिवस असून भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांचे पोस्टर्स लागलेत. त्यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून मुख्यमंत्र्यांचा करेक्ट कार्यक्रम करतील, असं विधान केलं. त्यांच्या याच विधानाचा आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी जोरदार समाचार घेतला. (Sanjay Shirsat on Sanjay Raut they war Thackeray group Board of The End soon before UBT)
आज प्रसारमाध्यमांशी आमदार शिरसाट यांनी संवाद साधला. तेव्हा त्यांना खासदार राऊतांनी केलेल्या दाव्याविषयी विचारले असता, ते म्हणाले, राऊतांनी यापूर्वी देखील अनेकदा भविष्यवाणी केली आहे. सरकार एक महिन्यात पडेल, दोन महिन्यात पडेल, हे सरकार बेकायदेशीर आहे, अशा वल्गना करत ते कायम टीका करत आलेत. पण, सरकार काही पडलं नाही. आता उलट मजबूत झालं आहे. त्यामुळं राऊतांच्या वल्गनांना आता काहीच किंमत उरली नाही. त्यामुळं आता आमच्याबाबत काय बोलावं हे कळत नसल्यानं त्यांनी हे नवीन पिल्लू काढलं. आम्ही तुमचा यापूर्वीच करेक्ट कार्यक्रम केला आहे. त्यामुळं आमच्या नादी लागण्याची ताकद कुणातही राहिलेली नाही, असंही शिरसाट म्हणाले.
पवारांना सरकारमध्ये घ्यायचं आणि शिंदे यांची हकालपट्टी करायची ही भाजपची स्क्रिप्ट होती. त्याचा पहिला अंक पूर्ण झाल्याचे राऊत म्हणाले होते. यावर शिरसाट म्हणाले की, ठाकरेंना आता काँग्रेस आणि पवारही विचारत नाहीत. त्यामुळेच ‘द एंड’चा बोर्ड लवकरच ठाकरे गटासमोर लागेल. आम्ही शिवसेनेतील बंडाची स्क्रिप्ट दीड वर्षांपूर्वी लिहिली होती. त्याची पुन:पुन्हा कल्पना देऊनही त्यांना याची जाणीव झालेली नव्हती. आता त्यांच्या ‘द एंड’चा शॉट राहिलेला असून याची त्यांनी चिंता करावी. ते ‘एकला चलो रे’च्या भूमिकेत आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या स्क्रिप्टचा विचार करावा. ‘द एंड बोर्ड’ कधीही तुमच्यासमोर लागेल, आपण होतो, असं अंस म्हणण्याची पाळी त्यांच्यावर येणार आहे, असं शिरसाट म्हणाले.