शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवा, कॅफेटेरिया परिसरात निर्बंध लावा; अंबादास दानवेंची मागणी

शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवा, कॅफेटेरिया परिसरात निर्बंध लावा; अंबादास दानवेंची मागणी

नागपूर : शाळेत होत असलेल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी शाळेत टप्प्याटप्प्यानं सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासह शाळा महाविद्यालय परिसरात असलेल्या कॅफेटेरियांवर निर्बंध लावावेत, अशी आग्रही मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

अल्पवयीन मुलींना स्वसंरक्षणाचे धडे व शाळेत सीसीटीव्ही बसवणे आवश्यक आहेत, त्याबाबत सरकारनं काही उपाययोजना केल्यात का? त्याचबरोबर अल्पवयीन मुलांच्या हातून लैंगिक गुन्ह्यांचे प्रकार समोर येताहेत, त्यामुळं शालेय शिक्षणात लैंगिक शिक्षणाबाबत जनजागृती करणं आवश्यक आहे. त्याबाबत सरकारनं काही उपाययोजना केल्यात का? असा सवालही यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला.

अकोला, बीडसारख्या जिल्ह्यात महाविद्यालय परिसरात असलेल्या कॅफेटेरियामध्ये मुलींवर घडलेले प्रकार दानवे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून, त्यावर कठोर निर्बंध लावण्याची मागणी केली.त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनाअनुदानित शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याबाबत सक्ती करण्याची सूचना केली जाईल व शक्य असल्यास मदत दिली जाईल अशी ग्वाही यावेळी उत्तरादरम्यान दिली.

अल्पवयीन मुलींना लैंगिक शिक्षणाबाबत गुड टच बॅड टचचे पोलीस दिदींकडून धडे देण्यात येत असल्याची माहिती दिली. महाविद्यालय परिसरातील कॅफेटेरियावरील निर्बंध व शाळेतील सीसीटीव्ही लावण्याबाबत दोन सचिवांची कमिटी तयार करण्यात येईल, असं आश्वासन गृहमंत्री यांनी दानवे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर दिलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube