‘17 सप्टेंबरनंतर काय होतं ते बघा’; संजय राऊत आक्रमक, फडणवीस-शिंदेंवर गंभीर आरोप अन् मोदींवरही निशाणा
Sanjay Raut संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत जुन्नर अत्याचार प्रकरणावरून फडणवीस-शिंदेंवर आरोप करत पंतप्रधान मोदींवरही निशाणा साधला.
Sanjay Raut Targets Fadnavis, Shinde and PM Modi : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत जुन्नरमधील अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या प्रकरणावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Fadanvis) यांना लक्ष्य करताना, “लहान मुलींवर अत्याचार तुमच्या राज्यात होत आहेत, तुम्हाला काही वाटत नाही का?” असा सवाल त्यांनी केला.
मुंबईच्या दोन डॉक्टरांना पाकिस्तानचा सर्वोच्च नागरी पुरस्कार; जिनांचा ‘तो’ आजार ठेवला गुप्त
जुन्नरमध्ये या घटनेनंतर अजूनही संतप्त वातावरण असल्याचे राऊत यांनी म्हटले. “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे फेल्युअर गृहमंत्री आहेत. पोलिसांनीही या प्रकरणात हात वर केले आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
‘एकनाथ शिंदे, कोणाला वाचवत आहात?’
साहिल देविदास चौघुले हा शिंदे गटाचा स्वीकृत नगरसेवक असल्याचा दावा करत राऊत यांनी त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. संबंधित मुलगी न्यायासाठी अनेक ठिकाणी जाऊन थकली असल्याचेही त्यांनी म्हटले.
या प्रकरणासाठी पाठपुरावा करणाऱ्यांवर पोलिसांकडून दबाव आणला जात असल्याचा आरोपही राऊत यांनी केला. रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत हे संबंधितांना चार-चार तास बसवून ठेवतात आणि प्रकरण मागे घेण्यासाठी दबाव टाकला जातो, असा दावा त्यांनी केला. “संबंधितांना खोट्या केसमध्ये अडकवून आत टाकण्याची धमकी दिली जाते. मी आव्हान देतो, खोटी केस दाखल करून दाखवा. नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी हे प्रकरण मार्गी लावावे, अन्यथा मी हे प्रकरण मार्गी लावेन,” असा इशारा राऊत यांनी दिला.
तसेच, “एकनाथ शिंदे, तुम्ही या प्रकरणात कोणाला वाचवत आहात का? तुम्ही या प्रकरणाला पाठिंबा देता का?” असा सवाल करत भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेकडून वरून दबाव आणला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर भाष्य करण्यास नकार
सर्वोच्च न्यायालयातील सुरू असलेल्या सुनावणीबाबत बोलताना राऊत यांनी अधिक भाष्य करण्यास नकार दिला. न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याने त्यावर बोलणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, कपिल सिब्बल आणि देवदत्त कामत यांचा युक्तिवाद स्पष्ट असल्याचे ते म्हणाले.
मंत्र्यांच्या विद्यापीठ दौऱ्यावरही टीका
मंत्र्यांच्या विद्यापीठ दौऱ्यावरूनही राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. “पंतप्रधानांचा दौरा कठीण आहे. खात्याचे काम सोडून आता विद्यापीठात दौरा करणार? जाऊ द्या, विद्यापीठात मुलांसोबत चर्चा करू द्या,” असा टोला त्यांनी लगावला.
केंद्र सरकार पुन्हा E10 पेट्रोल आणणार? E20 मुळे इंजिन अन् मायलेजच्या तक्रारी वाढल्याने निर्णय घेणार
“काहीही केले तरी आता जेन-झी भाजपसोबत येणार नाही,” असा दावा करत मंत्र्यांनी विद्यापीठात जाण्यापेक्षा महाराष्ट्रातील आश्रमशाळांना भेटी द्याव्यात, असेही राऊत म्हणाले.
‘17 सप्टेंबरनंतर काय होतं ते बघा’
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचा संदर्भ देत राऊत यांनी मोठा राजकीय दावा केला. “पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पंतप्रधान म्हणून हा शेवटचा वाढदिवस असेल. त्यानंतर ते पंतप्रधान राहणार नाहीत,” असे ते म्हणाले.
“17 सप्टेंबरनंतर तुम्हाला कळेल की नरेंद्र मोदींचं काय होईल आणि त्यांना कोणत्या प्रसंगांना सामोरं जावं लागेल,” असा दावा राऊत यांनी केला. अमित शाह पंतप्रधान होणार नसल्याचे सांगत त्यांनी मोदी आणि शाह यांच्यावरही टीका केली. “मोदी आणि अमित शाह ‘एकावर एक फ्री’ आहेत,” असा टोला त्यांनी लगावला.
चंपत राय यांच्या मुद्द्यावरूनही सरकारवर निशाणा
चंपत राय यांच्या संदर्भात बोलताना राऊत यांनी महाराष्ट्रातही ‘चंपत राय’ असल्याचे म्हटले. चंपत राय यांना क्लीनचिट देण्यात आल्याचा दावा करत त्यांनी महाराष्ट्रातील बलात्काराच्या आरोपींना क्लीनचिट दिली जात असल्याचा आरोप केला.
दरम्यान, पुण्यात शनिवारी मोरगाव येथे ‘रामरक्षा आंदोलन’ करण्यात येणार असून आपण स्वतः या आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली.
विनोद तावडेंबाबत राऊत काय म्हणाले?
भाजप नेते विनोद तावडे यांच्याबाबतही राऊत यांनी भाष्य केले. तावडे हे भाजपच्या जुन्या फळीतील नेते असून त्यांनी प्रमोद महाजन यांच्यासोबत काम केले आहे, असे ते म्हणाले. काही काळ तावडे यांना पक्षापासून दूर राहावे लागले होते; मात्र आता त्यांना पुन्हा पक्षात संधी दिली जात असल्याचे राऊत यांनी नमूद केले.
Awarapan 2 ची जादू कायम! पहिल्याच सोमवारी 10.06 कोटी रुपयांची कमाई