Pawar family crisis; शरद पवारांनीही केला होता थोरल्या भावाच्या विरोधात प्रचार
Maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणात 2 जुलैला मोठा राजकीय भूकंप झाला. विरोधीपक्षनेते असलेले अजित पवार पाचव्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. या भूकंपाचे हादरे फक्त महाराष्ट्रचे नव्हे तर दिल्लीत देखील जाणवले. पण त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवारांच्या देहबोलीत कोणताही ताण नव्हता, आपला पुतण्याने आपल्या धोका दिलाय याचा संताप, उद्वेग, खंत त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. अतिशय मिश्किलपणे पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देत होते.. हास्य विनोद करत होते. अजित पवारांबद्दल त्यांचा नरमाईचा स्वर होता. त्याच मूडमध्ये त्यांनी दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात केली. सुप्रिया सुळे देखील अजित पवरांबद्दल आदराने बोलत होत्या. ऐवढे सर्व रामायण घडल्यावर देखील शरद पवार शांत, संयमी कसे? यांचं अनेकांना कुतूहल वाटतंय.
1960 ची पोटनिवडणूक
बारामती लोकसभा मतदारसंघातून 1957 ला निवडून आलेले काँग्रेस खासदार केशवराव जेधे यांचे 1960 मध्ये निधन झाले होते. त्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली. काँग्रेसने केशवरावांचे पुत्र गुलाबराव जेधे यांना उमेदवारी दिली. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने शरद पवार यांचे थोरले बंधू ॲड. वसंतराव पवार यांना उमेदवारी जाहीर झाली. साहजिकच संपूर्ण पवार कुटुंबीय वसंतरावांचे म्हणजेच संयुक्त महाराष्ट्र समितीचे काम करत होते. अपवाद होता फक्त घरातल्या तरुण शरदचा.
शरद पवारांचे बंड
शरद पवार हे त्यावेळी काँग्रेसचे सक्रिय पदाधिकारी कार्यकर्ता होते. त्या पोटनिवणुकीबद्दलची आठवण सांगताना शरद पवार लिहितात – “माझ्या बंधूंना मी काँग्रेसचं काम करणार असल्याचं प्रामाणिकपणानं आणि स्पष्टपणानं सांगितलं. वास्तविक वसंतराव हे आम्हा भावंडांचे आधारस्तंभ होते. आम्हा साऱ्यांचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली होती. आमच्या कुटुंबातले ते पहिलेच कायद्याचे पदवीधर होते. त्यामुळे आम्हाला त्यांच्या प्रति खूप आदर आणि अभिमानही होता. त्यामुळे त्यांच्या विरोधात काम कसं करायचं, याचं भावनिक दडपण माझ्यावर होतच; पण माझं म्हणणं ऐकल्यावर त्यांनी नुसतं ते मान्यच केलं नाही तर म्हणाले की, “तू काँग्रेसचे विचारसरणी स्वीकारली आहेस तर काम त्याच पक्षाचं आणि त्याच्याच उमेदवाराचं केलं पाहिजेस.
राष्ट्रवादीतला संघर्ष पेटला, दोन्ही गटांनी बजावला व्हीप; आमदारांंची गोची
” माझ्या आईने तर आणखी बळ दिलं. ती म्हणाली, “तुझ्या विचारात स्पष्टता आहे, याचा मला आनंद आहे. त्यामुळे तू प्रामाणिकपणानं ‘काँग्रेस’चंच काम केलं पाहिजे. त्यामुळे कुटुंब का पक्ष अशी मनात कोणतीही घालमेल न होता मला निर्णय घेता आला. माझी जराशीही मानसिक कोंडी झाली नाही. याचे कारण माझे हे आप्तस्वकीय. या निवडणुकीत मी मनापासून काँग्रेसचं काम केल्यामुळे पक्षातल्या नेत्यांच्या मनातही एक कौतुकाची भावना तयार झाली. एका परीने सख्ख्या मोठ्या भावाच्या विरोधात उभा राहिल्यानं ‘पोरगा विचारानं पक्का’ असल्याची त्यांची खात्री पटली.”
पवार पुढं सांगतात, ”माझ्या विचारांतली स्पष्टता, काम करण्याचा झपाटा पाहून प्रदेशाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी मला मुंबईत बोलावून नव्या जबाबदारीचं सुतोवाच केलं. ‘काँग्रेस’च्या प्रदेश कार्यालयातल्या टिळक भवनात मला निवासासाठी एक खोलीही देण्यात आली. माझ्या राजकीय जीवनातला तो एक महत्त्वपूर्ण आणि ठळक टप्पा होता.”
Eknath Shinde : तब्बल 51 वर्षानंतर दोनशे आमदारांचा पाठिंबा मिळवणारे एकमेव मुख्यमंत्री
1960 च्या निवडणुकीत शरद पवार यांनी सख्खे थोरले बंधू वसंतराव पवार यांच्या पराभवासाठी अपार कष्ट घेतले आणि त्यांचा पराभवही केला. त्या पोटनिवडणुकीत संयुक्त महाराष्ट्र समितीचे बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ॲड. वसंतराव पवार यांचा पराभव करून काँग्रेसचे गुलाबराव जेधे विजयी झाले. थोरल्या भावाचा पराभव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावूनच तरुण शरद पवारांनी त्याकाळी यशवंतराव चव्हाण, किसन वीर यांचा विश्वास संपादन केला होता.
2023 अजित पवारांचे बंड
संपूर्ण परिवार एका बाजूला असताना त्यांच्या विरोधात जात पवार घराण्यातली पहिली राजकीय बंडखोरी यशस्वी करणारे शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी बंडखोरी केलीय. याही वेळी संपूर्ण पवार कुटुंब म्हणचे शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार हे सर्वजण एका बाजूला आणि अजित पवार दुसऱ्या बाजूला असे चित्र आहे. अजित पवार यांनी स्पष्टता दाखवत प्रामाणिकपणाने आपले बंड पुढे नेण्याची तयारी चालवली आहे. त्यामुळे ‘पवार विरुद्ध पवार’ असे चित्र निर्माण झाले आहे; अर्थातच ते पवार घराण्यातील पहिलेच बंड नाही आणि व्यक्तिगत पातळीवरचे तर नाहीच नाही.
Family Political Crisis : काका विरुद्ध पुतण्या! कोण ठरलं देशातील राजकीय आखाड्यात ‘वस्ताद’
विशेष हेच की पवार घराण्यात पहिल्यांदा बंडाचा झेंडा फडकविणाऱ्या शरद पवार यांनाच पवार घराण्यातला या दुसऱ्या बंडाचा सामना करावा लागतो आहे. अजित पवार यांचे बंड पवार ‘एन्जॉय’ करत आहेत, असं भासलं ते कदाचित यामुळेच. अजित पवार यांचा हा पवित्रा किती काळ टिकतो ते भविष्यात समजेल.
शिंदे-फडणवीस सरकार बरोबर अजित दादा चोरून गेलेले नाहीत. शरद पवार-सुप्रिया सुळे यांना पूर्ण कल्पना देऊनच त्यांनी शपथविधीसाठी राजभवनाकडे प्रस्थान ठेवले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत काका-पुतणे पुन्हा एक झाले तर आश्चर्य वाटणार नाही. कारण राजकीय भूमिका आणि कुटुंब यात गल्लत न करण्याची पवार घराण्याची आजवरची रीत आहे.