अकोल्यात शरद पवारांची कृपा कोणावर होणार? भांगरेंना बळ देणार की पिचड…

अकोल्यात शरद पवारांची कृपा कोणावर होणार? भांगरेंना बळ देणार की पिचड…

अहमदनगर – दिवंगत नेते अशोक भांगरे (Ashok Bhangre) यांच्या 61 व्या जयंती उत्सव सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे शुक्रवारी (19 जुलै) रोजी अकोले शहरात येणार आहेत. दरम्यान पवारांचं अकोल्यात येण्याचं निमित्त जरी जयंती सोहळ्याचं असलं तरी या दौऱ्याला आगामी विधानसभा निवडणुकांमुळे (Assembly elections) राजकीय महत्व प्राप्त झालं. पवारांच्या या दौऱ्यामुळं अकोल्याचे राजकारण ढवळून निघणार आहेत.

मनोरमा खेडकरांच्या अडचणीत होणार वाढ? ‘त्या’ प्रकरणात होणार सखोल चौकशी 

अजितदादांच्या शिलेदाराला शह देणार…
अकोल्यात सध्या राष्ट्रवादीचे किरण लहामटे हे विद्यमान आमदार आहे. राष्ट्रवादीमधील फुटीनंतर शरद पवार गट व अजित पवार गट निर्माण झाला. यामध्ये लहामटे यांनी प्रथम शरद पवार यांच्यासोबत राहणे पसंत केले. मात्र नंतर त्यांनी अजित पवारांची वाट धरली. यामुळे अजित पवारांच्या शिलेदाराला शह देण्यासाठी शरद पवार यांच्याकडून देखील मोर्चेबांधणी केली जात आहे.

प्रसाद लाड बांडगूळ, एवढंच प्रेम असेल तर फडणवीसांशी लग्न कर; जरांगेंची जीभ घसरली.. 

पवारांची ताकद भांगरेंच्या पाठीशी
तत्पूर्वी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते स्व. अशोकराव भांगरे यांचे सुपुत्र जिल्हा बँकेचे अध्यक्ष अमित भांगरे व अगस्ति कारखान्याच्या उपाध्यक्षा सुनिता भांगरे यांनी शरद पवार यांची काही दिवसांपूर्वी मुंबई येथे भेट घेतली होती. आगामी विधानसभा निवडणुकीत भांगरे कुटुंबातील माय-लेकांपैकी कुणा एकाला शरद पवार हे उमेदवारी देऊन आपली राजकीय ताकद त्यांच्या पाठीशी उभी करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र हे सगळं सुरु असताना पिचड कुटुंबियांची राष्ट्रवादीमध्ये वापसी होणार, अशा चर्चा तालुक्यात रंगल्या आहेत.

तत्पूर्वी इतिहास पहिला तर 2014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत जेष्ठ नेते मधुकर पिचड यांचे पुत्र वैभव पिचड एकसंघ राष्ट्रवादीकडून निवडून आले होते. त्यावेळी त्यांच्या विरोधात शिवसेनेचे मधुकर तळपडे आणि भाजप कडून लढलेले अशोक भांगरे पराभूत झाले. मात्र त्यांनतर 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पिचड पितापुत्र पुन्हा भाजपात आले. त्यांचा हा निर्णय अकोल्याच्या जनतेला पसंत पडला नाही आणि अकोल्यात बदल झाला. डॉ.किरण लहामटे हे निवडणुकीत विजयी झाले. मात्र राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या फुटीनंतर लहामटे अजित पवार गटात आहे. यामुळे आता त्यांना शह देण्यासाठी शरद पवार काय खेळी खेळणार हे पाहणे महत्वाचे आहे.

शरद पवार पिचडांना जवळ करणार?
2019 मध्ये शरद पवारांपासून दूर गेलेले पिचड कुटुंब आता पुन्हा एकदा शरद पवारांकडे येण्याच्या तयारीत आहे. विद्यमान आमदार लहामटे यांनी अजित पवारांना साथ दिली. या दरम्यान भांगरे कुटुंबाने शरद पवार यांच्या सोबत राहणे पसंत केले. आता शरद पवार विधानसभा निवडणुका समोर असताना तालुक्यात स्व.भांगरे यांच्या कार्यक्रमास येत असताना त्यांच्या भाषणाकडे अकोल्याच्या सर्व राजकारण्यांचे लक्ष लागून आहे. आपल्या भाषणात शरद पवार काय संकेत देणार? याकडे सर्वांच लक्ष लागलं.

दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने शरद पवारांचे आशीर्वाद कोणाला लाभणार? हेच पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube