राजीनामा… भावनिक साद… अन् निर्णय मागे…

राजीनामा… भावनिक साद… अन् निर्णय मागे…

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 2 मे 2023 रोजी ‘लोक माझी सांगाती’ ह्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या अनावरण समारंभावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर करतो असे घोषित केले. दरम्यान कोणत्याही नेत्याला याची पूर्वकल्पना नसल्याने कार्यकर्त्यांसह उपस्थित नेतेमंडळी देखील चांगलेच गडबडले. पवारांची घोषणा अन राज्याच्या राजकारणात एकच मोठी खळबळ उडाली

उपस्थित नेत्यांनी त्याच ठिकाणी शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा अशी विनंती देखील केली. यावेळी अनेक नेत्यांना अश्रू देखील अनावर झाले यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी साहेब तुम्ही निर्णय मागे घ्यावा अशी विनंती केली. तसेच अनेक लोकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मात्र हे सगळं सुरु असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मात्र इतर नेत्यांपेक्षा वेगळं मत मांडलं.

अजित पवार म्हणाले, सगळ्यांच्या भावना शरद पवारांनी पाहिल्या आहेत. शरद पवार अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षात नाही असं नाही. शरद पवारांच्या वयाचा विचार करता एका नव्या नेतृत्वाकडे आपण जबाबदारी देण्याचा विचार करत आहोत. शरद पवार परिवाराचे प्रमुख म्हणूनच काम करणार आहेत. त्याबद्दल शंका असण्याची गरज नाही. काळानुरुप काही निर्णय घ्यावे लागतात. आता साहेबांच्या डोळ्यादेखत नवीन अध्यक्ष झाला तर तुम्हाला का नको रे? मला तुमचं काय कळत नाही. ,” असं म्हणत अजित पवारांनी विरोधकांना खडसावलं

दरम्यान पवारांच्या राजीनाम्यानंतर मुंबईमधील वाय बी चव्हाण सेंटर बाहेर राष्ट्रवादी समर्थकांनी आंदोलन सुरु केले. शरद पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा यासाठी कार्यकर्ते आक्रमक झाले. दरम्यान कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेत येत्या 2 दिवसात याबाबत मी माझा अंतिम निर्णय जाहीर करेल असे आश्वासन शरद पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले.

अखेर तीन दिवसांनी कार्यकर्त्यांच्या व नेत्यांच्या भावनांचा आदर करत शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपला पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा अखेर मागे घेतला. पवार म्हणाले, माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने ‘मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे’ या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे. दरम्यान तीन दिवसांच्या राजकीय घडामोडीनंतर अखेर पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा शरद पवार यांच्याच खांद्यावर देण्यात आल्याचे पाहायला मिळाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube