मातोश्रीवर तुमच्यासमोर झुकत होतो का? संजय शिरसाटांचा ठाकरेंना उपरोधिक सवाल…
Sanjay Shirsath On Udhav Thackeray : आम्ही मातोश्रीवर यायचो तेव्हा तुमच्यासमोर झुकत होतो का? असा उपरोधिक सवाल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी उद्धव ठाकरेंना (Udhav Thackeray) केला आहे. दरम्यान, शिवसेनेच्या बंडानंतर शिंदे गटाच्या आमदारांना ठाकरेंकडून टोमणे मारल्याचं पाहायला मिळतंय. उद्या होणाऱ्या मुलाखतीच्या टीझरमध्येही त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांना दिल्लीत जाऊन झुकावं लागत असल्याचा टोला लगावला आहे. त्यावर आक्रमक पवित्रा घेत शिरसाटांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीच्या टीझरमध्ये अडीच वर्षांच्या कार्यकाळात मुख्यमंत्रिपदाचा कारभार ज्या पद्धतीने चालवला हे सांगितलं पाहिजे होतं, पण ते टोमणे मारीत आहेत. आता टोमणे मारुन काय अर्थ आहे, लोकांना आता त्याची सवय झालीयं, त्यामुळेच सभेला गर्दी कमी होत असल्याचं शिरसाट म्हणाले आहेत.
“अन् टोल नाका फुटला” : अमित ठाकरेंनी सांगितली मध्यरात्रीच्या खळ्ळखट्याकची हकीकत
तसेच आम्ही मातोश्रीवर येत होतो, तेव्हा तुमच्यासमोर झुकत होतो का? केंद्र सरकारकडून राज्याच्या विकासासाठी केंद्रात जाऊन संवाद साधावा लागतो, त्याला तुम्ही पॉझिटिव्ह घ्या निगेटिव्ह का घेता? असंही ते म्हणाले आहेत. तुम्ही काश्मीरमध्ये भारत जोडो यात्रेत जाऊन काय केलं? राहुल गांधींच्या पाया तुम्ही पडलात, त्यांनी तुम्हाला काय दिलं, असाही उपरोधिक सवाल त्यांनी केला आहे.
मुलाखतीच्या प्रोमामध्ये ठाकरे म्हणाले :
माझं सरकार वाहून गेलं नाही, तर खेकड्यांनी धरण फोडलं असल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंनी केला आहे. तसेच शिंदे गटाच्या आमदारांनी दिल्लीला मुजरा करावा लागतो, उद्धव ठाकरेंची तुम्हाला भीती का वाटत आहे, मला संपवण्यात आनंद मिळत असेल तर संपवा मग बघुया, उद्धव ठाकरे फक्त एकटा नाहीतर वडिलांचे आशिर्वाद आणि जनतेची साथ अन् समोर तुमची ताकद, असल्याचं आव्हान ठाकरेंनी भाजपला दिलं आहे.
दरम्यान, बाळासाहेबांचे विचार सोबत असते, तर उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली नसते. बाळासाहेब समजायला शिवसैनिक व्हावं लागतं, मुलगा होऊन चालत नसल्याचीही टीका त्यांनी यावेळी केली आहे. आता उद्या त्यांची मुलाखत होणार आहे, या मुलाखतीत ते टोमण्यांची किती मर्यादा गाठतात? हे पाहण्यासाठीच आम्ही मुलाखत पाहणार असल्याचं शिरसाटांनी स्पष्ट केलं आहे.