‘भाजपमध्ये येण्यासाठी रांग पण, फडणवीसांनी नो रूम अॅव्हेलेबलचा बोर्ड लावलाय ‘
पुणे : लोकसभा निवडणुकीत ( Lok Sabha elections) भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर विरोधकांनी इंडिया (INDIA) नावाची आघाडी तयार केली. या आघाडीच्या २ बैठका आतापर्यंत पार पडल्या आहेत. या आघाडीची तिसरी बैठक आता मुंबईत होणार आहे. यावरून भाजपचे नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आम्ही एकत्र असण्याच्या भीती पोटी विरोधक एकत्र येत असल्याची टीका त्यांनी केली. भाजपमध्ये येण्यासाठी रांग लागलीये, पण देवेंद्र फडणवीसांनी बोर्ड लावलाय, नो रुम अॅव्हेलेबल असे मुनगंटीवार यांनी सांगितले. (Sudhir Mungantiwar on opposition party over INDIA)
आज पुण्यात ऑल इंडिया जीएसटी परिषदेची बैठक झाली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर टीका केली. ते म्हणाले, आम्ही एकत्र आहोत. त्याची धास्ती विरोधकांनी घेतली. आमच्या एकत्र असण्याच्या भीतीपोटी आता विरोधक येत आहेत. मात्र, राज्याच्या विरोधी पक्षातील अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत. सध्या हाऊसफुलचा बोर्ड लावला आहे. सर्वजण भाजप सोबत येण्याची वाट पाहत असल्याचं त्यांनी सांगितलं.
कोविड सेंटरमधील बॉडी बॅग खरेदी करतांना घोटाळ्या झाल्याच्या आरोपाखाली माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. याविषयी विचारले असता मुनगंटीवार यांनी सांगिलतं की, नेता होणं, पाढंरं स्वच्छ कपडे घातल्यानं तुम्हाला कोणतेही कवच कुंडल प्राप्त होत नाही. त्याची चौकशी होणं क्रमप्राप्त आहे. याआधी अनेक नेत्यांची चौकशी झाली आहे. मोदीजींची, अडवाणींची चौकशी झाली. 2014 पर्यंत ED चे 2200 गुन्हे दाखल झाले. आता काळजी कशाची? भीती का? असा उपरोधिक सवाल केला.
कर्ज माफीची घोषणा केली. मात्र, अद्याप काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैस आले नाही, असा आरोप एकनाथ खडसेंसह बच्चू कडूंनी केला होता. यावर मुनगंटीवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, काही लोकांना मदत मिळणं बाकी आहे. राज्यात अनेक नवनवीन योजना आणल्या जात आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजने १लाख ५० हजार वरून पाच लाखांची मदत केली जाते. महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सुट दिली. शिक्षक सेवकांचं, कृषी सेवकांचं अंगणवाडी सेवकांच मानधन वाढवलं. आता तर सर्वांना मोफत उपचार दिले जाणार आहेत. त्यामुळं सरकारवर आर्थिक ताण आहे. मात्र, सरकार जनहिताचेच निर्णय घेत आहे. मात्र, जे तीन वर्षात जगातला सारा फेविकॉल तोंडाला लावून बसले होते. त्यांना आता कंठ फुटतो का? अशी टीकाही त्यांनी केली.
तुम्ही कधी मुख्यमंत्री होणार आणि मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार, असा प्रश्न विचारताच मुनगंटीवर म्हणाले, मला वाटतं की, फिजिक्सच्या पेपरला फिजिक्सचाच प्रश्न विचारावा. हा प्रश्न तुम्ही मुख्यमंत्र्यांना विचारा. हा माझा अधिकार नाही. आणि मला मुख्यमंत्री व्हायचं नाही. सीएम पेक्षा कॉमन मॅन मला महत्वाचा असल्याचं त्यांनी सांगितलं.
वन संरक्षक परिक्षेचा पेपरफुटीचा प्रकार छत्रपती संभाजी नगरमध्ये घडला. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना अटक झाली आहे. पेपर फुटला नाही तर नकली पेपर दिले गेले होते. विद्यार्थ्यांनी सावध राहिले पाहिजे. त्यांनी कोणत्याही एजंट वर विश्वास ठेवू नये.