अजितदादांचा अपघात, अजितदादांबद्दलची वादग्रस्त वक्तव्ये आणि ‘मफलर मॅन’; सुनील तटकरेंनी सगळ्यांचा समाचार घेतला!
Sunil Tatkare reacts: सुनील तटकरेंनी अजित पवार यांच्या अपघाताबाबतची चौकशी, आनंदराज आंबेडकर यांच्या वादग्रस्त विधानाबाबत भूमिका स्पष्ट केली.
Sunil Tatkare reacts to Ajit Pawar’s accident, Anandraj Ambedkar’s controversial remark: पुणे :अजित पवार यांच्या अपघाताबाबत सुरू असलेली चर्चा, आनंदराज आंबेडकर यांनी अजितदादांबाबत केलेले वक्तव्य आणि मफलर मॅनवरुन (Muffler Man) करण्यात आलेले आरोप, अशा विविध मुद्द्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत भाष्य केले. यावेळी त्यांनी संबंधित वक्तव्यांचा निषेध करत आरोप करणाऱ्यांना जाब विचारला. तसेच अजितदादांच्या अपघाताचे सत्य समोर येईपर्यंत चौकशीच्या मागणीवर ठाम राहणार असल्याचेही स्पष्ट केले. राज्यातील दुष्काळी मदतीबाबत बोलताना 5 हजार रुपयांच्या मदतीचे वाटप सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्र सरकारकडे मोठा मदत प्रस्ताव पाठवला असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) राज्यातील शेतकऱ्यांना भरीव मदत करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सिंहगड संस्थेतील संपावर अखेर पडदा, कोंढवा-नऱ्हे कॅम्पसमधील कर्मचारी कामावर रुजू
आनंदराज आंबेडकरांच्या विधानाचा निषेध
आनंदराज आंबेडकर यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत केलेल्या विधानाचा तटकरे यांनी जाहीर निषेध केला. स्वर्गीय अजित पवार यांनी महाराष्ट्रासाठी दिलेले योगदान लक्षात घेतले पाहिजे. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असला, तरी अशा प्रकारची वक्तव्ये करणे निंदनीय आहे, असे ते म्हणाले. महायुतीतील घटक पक्षांनी आपापली भूमिका मांडताना समन्वय राखला पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
अजितदादांबद्दल काय म्हणाले होते आंबेडकर?
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावरून आनंदराज आंबेडकर यांनी सरकारवर टीका केली होती. यावेळी त्यांनी अजित पवार यांचा उल्लेख करत उपरोधिक विधान केले. ‘आपले राज्यकर्ते म्हणतात की पाणी आडवा, पाणी जिरवा. जिथे पाऊसच पडत नाही, तिथे तलाव भरण्यासाठी अजितदादांना आणायचं का?’ असा सवाल त्यांनी केला होता.
शेवटच्या लोकलमधला थरार पुन्हा रंगमंचावर, बदलत्या पिढीच्या नजरेतून ‘प्रपोजल’ उलगडणार – राजन ताम्हाणे
मात्र, या विधानानंतर आनंदराज आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिले. अजित पवार यांनी यापूर्वी पाण्याच्या संदर्भात केलेल्या विधानाचा आपण उपरोधिकपणे उल्लेख केला होता, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
संजय राऊत यांची वक्तव्ये वैफल्यग्रस्त
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विधानांवरही तटकरे यांनी टीका केली. स्वतःचे अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांकडे बोट दाखवण्याची प्रवृत्ती वाढत आहे. संजय राऊत यांची वक्तव्ये वैफल्यग्रस्त आहेत. 2024 मध्ये तुमचा पक्ष वेगळा का झाला, याचे त्यांनी आत्मचिंतन करावे, असा टोला तटकरे यांनी लगावला.
खासदार फुटीच्या चर्चांना कपोलकल्पित म्हटलं
डिलिमिटेशन विधेयक आणि खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चांवर बोलताना तटकरे यांनी या चर्चांचे खंडन केले. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर घेतलेली भूमिका स्वागतार्ह आहे. महिलांना आरक्षण मिळाल्यास आम्ही विचार करू, असे त्यांनी म्हटले आहे. अशा विधेयकाला आमचा पाठिंबा आहे. मात्र, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या पक्षातील खासदार आमच्याकडे येतील, हे संजय राऊत यांचे विधान कपोलकल्पित आहे, असे तटकरे म्हणाले.
बारामतीत गोळीबार; इन्स्टाग्रामवरून मागितली 2 लाखांची खंडणी, नेमकं प्रकरण काय?
डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा म्हणजे भाजपला पाठिंबा नाही
डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिल्यामुळे भाजपला पाठिंबा दिला, असा अर्थ काढणे चुकीचे असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले. एखाद्या विधेयकाला पाठिंबा देणे आणि सरकारला पाठिंबा देणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. प्रत्येक पक्ष आपल्या विचारानुसार धोरणात्मक निर्णय घेत असतो. हे विधेयक क्रांतिकारी असून सुप्रिया सुळे यांनी मांडलेल्या भूमिकेचेही स्वागत करतो, असे ते म्हणाले. शरद पवार यांच्या पक्षाबाबतचा निर्णय पवार साहेबच स्पष्ट करतील, असेही त्यांनी सांगितले.
आमदारांच्या भेटीला राजकीय रंग देऊ नका
पंढरपूरमधील आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतल्याच्या चर्चेवरही तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत. प्रोटोकॉलनुसार विविध पक्षांचे आमदार त्यांची भेट घेत असतात. यामध्ये काही गैर नाही. विरोधी पक्षातील आमदारही आम्हाला भेटत असतात. त्यामुळे प्रत्येक भेटीला राजकीय अर्थ लावणे योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या भेटी या राजकीय कारणांसाठी नसून सामाजिक कार्य आणि विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
अजित पवारांच्या अपघाताचं सत्य समोर यायलाच हवं
अजित पवार यांच्या अपघाताच्या चौकशीबाबत बोलताना तटकरे यांनी पुन्हा एकदा सीआयडी चौकशीच्या मागणीचा पुनरुच्चार केला. पहिल्या दिवसापासून आम्ही सीआयडी चौकशीची मागणी करत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनीही याबाबत ठाम भूमिका मांडली आहे. या प्रकरणातील सर्व सत्य जनतेसमोर येणे गरजेचे आहे. सत्य समोर येईपर्यंत आम्ही आमच्या मागणीवर ठाम राहू, असे तटकरे म्हणाले.
खाटू श्यामजींच्या भक्तांवर काळाचा घाला; धुळ्यातील 9 भाविकांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी
भारत सरकारकडूनही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्र्यांची पुन्हा भेट घेणार असून, लवकरात लवकर सत्य समोर आणण्याची विनंती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संसदेच्या अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित करून चर्चा करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रवादीच्या सुनावणीबाबत काय म्हणाले?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हासंदर्भातील निवडणूक आयोगातील सुनावणी अद्याप सुरू झालेली नाही. सुनावणी सुरू झाल्यानंतर पक्षाकडून भूमिका मांडली जाईल. पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवडणूक आयोगाला सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचे नाव यापूर्वीच कळवले असल्याची माहिती तटकरे यांनी दिली.
दरम्यान, ‘मफलर मॅन’ संदर्भात बोलताना आरोप करणाऱ्यांनी आपण नेमके काय आणि कोणावर आरोप करत आहोत, याचा विचार केला पाहिजे, असा टोलाही तटकरेंनी रोहित पवारांना (Rohit Pawar) लावला.