जयंत पाटलांच निलंबन, राष्ट्रवादी राज्यभर आंदोलन करणार
मुंबई : विधानसभा अध्यक्षांना उद्देशून अपशब्द वापरल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्यावरील कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. जयंत पाटलांच्या निलंबनाच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आज रस्त्यावर उतरून निषेध आंदोलन करणार आहे.
पाटील यांच्या निलंबनानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत जल्लोषच केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. ‘आठ दिवस असेच जातील जयंत पाटील पुन्हा येतील…’ ‘हम मे है दम,करेक्ट कार्यक्रम करेंगे हम’ अशा घोषणा यावेळी विरोधकांनी दिल्या होत्या.
निलंबनाच्या घोषणेनंतर जयंत पाटलांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे. या निर्लज्ज ‘सरकार’ विरोधात लढत राहणार. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय…! असं दोन ओळींचं ट्वीट जयंत पाटलांनी केलं आहे.
मला निलंबित केलं तरी राज्यातील तरुणांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, महिलांच्या प्रश्नांसाठी मी लढतच राहणार. जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांची जसे की छत्रपती शिवाजी महाराजांसह महापुरुषांची बदनामी, राज्यातील तरुणांना भेडसावणारा बेरोजगारीचा प्रश्न, महागाई, शेतकरी आत्महत्या आदी मुद्द्यांवर अजिबात चर्चा होऊ नये, असा सरकारचा प्रयत्न आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.