TamilNadu Assembly Elections : सहा हजार कोटींची संपत्ती असलेल्या लॉटरी किंगची पत्नी रिंगणात ! कोणत्या पक्षाने दिली उमेदवारी ?
TamilNadu Assembly Elections-लॉटरी किंग सॅंटियागो मार्टिनच्या पत्नी लीमा रोझ हिला AIADMKने उमेदवारी दिलीय. तिने प्रतिज्ञापत्रात आपली, पती आणि मुलाच्या संपत्तीची माहिती दिलीय.
TamilNadu Assembly Elections : तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची (TamilNadu Assembly Elections) जोरदार रणधुमाळी सुरू आहे. आता रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या संपत्तीची इंटरेस्टिंग माहितीसमोर येत आहे. एका लॉटरी किंगची पत्नी रिंगणात आहेत. त्या लॉटरी किंगची आणि त्याची पत्नीची संपत्ती तब्बल पाच हजार कोटींची आहे. लॉटरी किंगच्या पत्नीची संपत्ती राज्यात सर्वाधिक आहे. तो लॉटरी किंग कोण आहे. कोणत्या पक्षाने तिकीट दिलंय हे पाहुया…
लॉटरी किंग सॅंटियागो मार्टिनच्या पत्नी लीमा रोझ हिला AIADMKने उमेदवारी दिलीय. तिने प्रतिज्ञापत्रात आपली, पती आणि मुलाच्या संपत्तीची माहिती दिलीय. या सर्वांची मिळून तब्बल पावणे सहा हजार कोटी संपत्ती आहे. लीमा रोज हिच्याकडे तब्बल अकराशे कोटींची संपत्ती आहे. त्यात 139 कोटी 62 लाखांची जंगम मालमत्ता आहे. त्यात रोख पैसे, ठेवी, वाहने आणि सोने चांदीची माहिती आहे. रोझ यांच्या विविध बँकांमध्ये 216 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. त्यांच्या मालकीची मर्सिडीज बेंझ, रेंज रोव्हर आणि बीएमडब्ल्यू यांसारखी तीन आलिशान वाहने आहेत आणि 150 ग्रॅम सोने आहे. तर 904 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. तर तिचे पती सँटियागो मार्टिन यांची एकूण संपत्ती 4 हजार 100 कोटी आहे. स्थावर मालमत्ता 887 कोटी इतकी आहे. तर जंगम मालमत्ता 3 हजार 262 कोटी इतकी आहे. तर त्यांचा मुलगा जोस मार्टिनकडे 225 कोटी इतकी संपत्ती आहे. विशेष म्हणजे लीमा रोजचे शिक्षण अवघे सहावी आहे. मार्टिन कुटुंब ओबीसी ख्रिश्चन आहेत. त्यांचे सर्वच राजकीय पक्षांशी चांगले संबंध आहेत. तामिळनाडूमध्ये ते द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) शी जवळून संबंधित होते आणि केरळमध्ये त्यांचे डाव्या लोकशाही आघाडी (एलडीएफ) सोबत चांगले संबंध होते.
निवडणूक रोख्यांचे सर्वात मोठे खरेदीदार
सँटियागो मार्टिन हे 1368 कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांचे (इलेक्टोरल बॉण्ड्स) सर्वात मोठे खरेदीदार आहेत. त्यांनी 2017 ते 2024 या काळात अनेक राजकीय पक्षांना हे रोखे दान केले आहेत. विशेष म्हणजे डीएमके आणि टीएमसीला सर्वाधिक देणगी दिलीय. डीएमकेला 503 कोटी, तर टीएमसीला 542 कोटी रुपये देणगी दिलेली आहे. तर मार्टिन यांच्या संबंधित टायगर असोसिएट्सने गेल्या आर्थिक वर्षात एआयएडीएमके पक्षाला 60 कोटी रुपये आणि डीएमकेला 50 कोटींची देणगी दिलीय. मार्टिन कुटुंब लॉटरी, रिअल इस्टेट, हॉस्पिटॅलिटी, सॅटेलाइट टेलिव्हिजन चॅनल आणि सॉफ्टवेअर व्यवसायाशी संबंधित आहे. तर त्यांची लॉटरी विक्री तब्बल 13 राज्यांमध्ये विकली जाते.
मार्टिन कुटुंबातील तिघे रिंगणात
मार्टिन कुटुंबातील तिघे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. लीमा रोज हे तामिळनाडूमधून निवडणूक रिंगणात आहेत. तर मुलगा जोस मार्टिन पुदुचेरीमधील कामराजनगरमधून निवडणूक लढवत आहे. तर त्यांचा जावई आधव अर्जुन चेन्नईमधील विल्लिवाक्कममधून टीव्हीकेचे उमेदवार आहेत.