“पण हा माणूस उठला अन् त्यांच्या मांडीवर जाऊन बसला…” : सावंतांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका
Tanaji Sawant Sais Uddhav Thackeray is only a blood heir : 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना-भाजप युती तुटली. यानंतर शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर मविआ स्थापन करून सत्ता मिळवली आणि भाजपला विरोधी बाकावर बसवले होते. त्यावरून दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार निशाणा साधला होता. मुख्यमंत्रीपदाच्या आमिषाने उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नादाला लागले, अशी टीका त्यांनी केली होती. दरम्यान, आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनीही उद्धव ठाकरे यांचा समाचार घेतला.
शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिंदे आणि ठाकरे गटाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसत आहेत. आता तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीवर पुन्हा एकदा टीका केली. परभणीतील एका कार्यक्रमात बोलतांना तानाजी सावंत म्हणाले की, शिवसैनिक म्हणजे विस्थापित. काँग्रेस-राष्ट्रवादी प्रस्थापित. आम्ही एकमेकांची थोबाडं पाहत नाही. पण, हा माणूस (उद्धव ठाकरे) उठला आणि थेट त्यांच्या मांडीवर जाऊन बसला, अशी टीका सावंत यांनी केली.
NCP चा 24 वा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये होणार, संग्राम जगताप यांच्यावर जबाबदारी
ते म्हणाले, आमचे तत्कालीन पक्षप्रमुख हे एका पदासाठी शरद पवार आणि काँग्रेस एका पदाच्या मांडीवर बसतात ही खेदाची गोष्ट आहे, उद्धव ठाकरे हे केवळ रक्ताचे वारसदार आहेत, आम्ही विचारांचे वारसदार आहोत, असं सावंत यांनी सांगितलं.
सावंत म्हणाले, काँग्रेस आणि ncp ला शिव्या घालण्यामध्ये हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांनी आपली हयात घालवली. त्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या मांडीवर नेऊन बसवलं. माझ्या पक्षाच्या सहकाऱ्यांनी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला, पण माजी मुख्यमंत्री ठाकरे अजून जागे झालेले नाहीत. त्यामुळे 40 अधिक 10, 13 खासदार अशा 50 आमदारांनी जनतेच्या हिताचा निर्णय घेतला. बाळासाहेबांच्या विचारांसाठी आणि हिंदुत्व वाचवण्यासाठी आम्ही बंड केलं, असेही सावंत म्हणाले.
यावेळी बोलताना सावंत यांनीही अधिकाऱ्यांना इशारा दिला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता अजूनही डोक्यावरून सत्ता गेली नसली तरी माझ्या रक्तातील शिवसैनिक प्रशासनाला तुमच्या डोक्यावरून पायाखाली आणल्याशिवाय राहणार नाहीत.
दरम्यान, आमच्या नादाला लागायचं नाही, शिवसैनिक सहन करायचं तेवढं सहन करतो. 2024 मध्ये तुम्हाला माती दाखवल्याशिवाय, राहणार नाही, असा इशारा तानाजी सावंत यांनी दिला.