‘शिंदेंचे आमदार संपर्कात’ म्हणणाऱ्यांना सामंतांनी खरं सांगितलं, म्हणाले, ठाकरेंचेच…
Uday Samant : अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) पद धोक्यात आलं. शिवाय शिंदे गटातील मंत्रिपदावरून नाराज असलेले आमदारही उद्धव ठाकरेंकडे जाणार असल्याचं बोललं जात आहे. एकमेकांवर आगपाखड करणारे हे दोन्ही गट एकत्र येण्याची शक्यता सुब्रमण्यम स्वामी यांनीही व्यक्त केली होती. दरम्यान, शिंदेंच्या नेतृत्वाखालील सेनेच्या (Shivsena) १२ आमदारांनी उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर फोन केला. पण ठाकरेंनी त्यांना भेटण्यास स्पष्ट नकार दिल्याचा दावा एका वृत्तपत्राने केला. या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली असून शिंदे गटाने हे वृत्त फेटाळून लावले आहे.
या संदर्भातील वृत्तानुसार, 27 जुलै रोजी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदे गटातील काही आमदार त्यांची भेट घेणार होते. ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शुभेच्छा द्याव्यात, असे त्यांचे मत होते. त्यासाठी त्यांनी मातोश्रीवर फोनही केला. मात्र ठाकरे यांनी त्यांना भेटण्यास स्पष्ट नकार दिला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेचा दाखला देत या आमदारांना भेटण्यास नकार दिला. तर दुसरीकडे, शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. ते म्हणाले की, आमच्यापैकी कोणीही उद्धव ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न केला नाही. याउलट, उद्धव ठाकरे यांच्या गटातील 13 आमदारांपैकी 10 आमदारांनी एकनाथ शिंदे यांना फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादीला वगळून ठाकरे अन् काँग्रेसचा ‘प्लॅन बी’? शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर
ते म्हणाले, जोपर्यंत आमचे सहकारी आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते, तोपर्यंत ते त्यांना कधीही भेटले नाहीत. त्यांच्याशी बोलता येत नव्हते. म्हणूनच त्यांनी बंड केले. या आमदारांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. अजित पवारही आता सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. ही शिंदे यांची लोकप्रियता आणि त्यांच्या कामाला मिळालेली पोचपावती आहे, असं सामंत म्हणाले.
सामंत यांनी सांगितलं की, ज्या दहा आमदारांनी एकनाथ शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला फोन केला, त्यातील 6 आमदार लवकरच शिंदे गटात सामील होणार आहेत. इथं आऊट गोईंगचा प्रश्न नही, इनकमिंग सुरू आहे. या सहा आमदारांची मी नावं सांगू शकतो. मात्र राजकारणात नैतिकता पाळली पाहिजे, असेही ते म्हणाले.