खासदार ओमराजे यांच्या खांद्यावर हात ठेवल्यानंतर तानाजी सावंत काय म्हणाले?
उस्मानाबाद : छत्रपती शिवाजी महाराज जयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti)सोहळ्याच्या निमित्तानं राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत,खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (Omraje Nimbalkar) व आमदार कैलास घाडगे-पाटील (Kailas Ghadage Patil) हे एकत्र आले. भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील (Rana Jagjeetsingh Patil)यांनी पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यावर केलेला आरोप व केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल पाहता आज पालकमंत्री तानाजी सावंत यांनी कटूता संपवत भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कट्टर विरोधक खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास घाडगे-पाटील यांच्यासोबत हातात हात उंचावून नमस्कार केला. त्यावेळी दोघांच्याही खांद्यावर हात ठेवल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. याबाबत मंत्री सावंत यांनी राजकीय वैर किंवा कटूता काही नसते आणि हा सोहळा तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा आहे. सर्वधर्मिय, सर्व पक्षीय मध्यवर्ती समितीचा आहे, त्यामुळं महाराष्ट्राच्या परंपरेनुसार मी वर्तन केलं. त्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, असं सांगत महाआरोग्य शिबीर व आरोग्य आपल्या दारी याबद्दलची माहिती दिली. भाजप आमदाराच्या तक्रारीला जिल्हाधिकारी तर संजय राऊतांच्या आरोपाला प्रवक्ते दीपक केसरकर उत्तर देतील असंही ते म्हणाले.
शिवजयंतीच्या कार्यक्रमातील हे फोटो माध्यमांवर व्हायरल होताच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं. निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर लगेच जिल्ह्यातील हे तीन नेते एकत्र दिसल्यानं उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. त्यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी स्पष्टीकरण दिलंय. ओमराजे म्हणाले, सर्वांचे राजकीय मार्ग ठरलेले आहेत, त्यामुळं आता त्यात तसुभरही बदल होणार नाही. त्यामुळं एक प्रकारे या चर्चांना खासदार ओमराजे निंबाळकरांनी तर पूर्णविराम दिलाय.
Thackeray Vs Shinde : सत्तासंघर्षाची सुनावणी 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोरच; सलग सुनावणी होणार
ठाकरे परिवाराशी एकनिष्ट राहून विरोधकांशी लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. सार्वजनिक शिवजयंतीच्या कार्यक्रमात कोणीही राजकीय नेता तिथं आपल्या पक्षाच्या पायघड्या ठेवत नाही. तेथे शिवभक्त म्हणून सहभागी होत असतो. पालकमंत्री तानाजी सावंत आणि आम्ही कोणत्या राजकीय व्यासपीठावर असतो तर त्याला राजकीय अर्थ प्राप्त झाला असता. पण अशा ठिकाणी महाराजांच्या जन्मसोहळ्याच्या निमित्तानं राजकारण करण्याएवढ्या संकुचित वृत्तीची भूमिका आमची अजिबात नसल्याचंही यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले.
त्याचबरोबर या फोटोमुळं चर्चेत आलेले आमदार कैलास घाडगे-पाटील म्हणाले, तेवढ्या काळापुरता खांद्यावर हात टाकला म्हणून वेगळ्या चर्चा घडत असतील तर ठाकरे परिवारानं मला आजची ओळख दिलेली आहे. मग त्याची तर किती चर्चा व्हायला हवी, असं म्हणत आमदार कैलास घाडगे पाटील (Kailas Patil) यांनी सध्या सुरू असलेल्या चर्चांवर आपली भूमिका स्पष्ट केलीय.