Supriya Sule : विखे पाटील मुख्यमंत्री होणार ? सुप्रिया सुळे यांचे हजरजबाबी उत्तर
Mahrashtra Politics : राज्यात पुढील काळात भाजपचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील, तर काँग्रेस पक्षाचे उमेदवार हे बाळासाहेब थोरात असू शकतात, असे वक्तव्य वंचित बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी नुकतेच केले होते. याबाबतच्या चर्चावर विखे पाटील यांना मुख्यमंत्री होण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी शुभेच्छा देत हजरजबाबी उत्तर दिले.
देवेंद्र फडणवीस यांना आवडणार नाही, भाजपचा पुढील काळात मुख्यमंत्री पदाचा उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील, असू शकतात, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. त्यावर सुप्रिया सुळे यांनी हजरजबाबी उत्तर दिले आहे. सुळे म्हणाल्या, की कोणीही काम करणारा माणूस मुख्यमंत्री होत असेल तर चांगली बाब आहे. मात्र, सध्या जे काही सुरु आहे. ते केवळ भाजपमधील 105 आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी सुरु असल्याचा टोला सुप्रिया सुळे यांनी यावेळी लगावला.
स्वार्थासाठी ईडी सरकार निवडणुका घेत नाही
ईडी सरकार (एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस) स्वार्थासाठी निवडणूक घेत नाही. त्यामुळे कृपा करुन जिल्हा परिषद, महापालिकेच्या निवडणुका घ्या, अशी मागणी खासदार सुप्निया सुळे यांनी गुरुवारी राज्य सरकारकडे केली आहे. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्याचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याचे धोरण आखले होते. मात्र, सध्याचे सरकार सत्तेचे विकेंद्रीकरण करण्याऐवजी सत्तेचे केंद्रीकरण करत आहे. त्यामुळे लवकरात लवकर जिल्हा परिषद, महापालिकांच्या निवडणुका घेण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.
उद्योगांना दादागिरी ? फडणवीसांना सुळेंचे उत्तर
उद्योगांवर दादागिरी होत असल्याने चाकण परिसरातून उद्योग बाहेर जात असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पुण्यात केली होती. मात्र, चाकणमधून एकही प्रकल्प बाहेर जात नाही. उलट आनंद महिंद्रा हे एक मोठा प्रकल्प लवकरच सुरु करत आहे, असे उत्तर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिले.