महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा पुण्यात मोठा धमाका…22 नेत्यांचा प्रवेश ठरला! काही नावे समोर
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील काही भाजप प्रवेश उद्या मुंबईत होणार आहे. प्रवेश करणाऱ्यांची संख्या 22 असल्याचं बोललं जात आहे.
22 leaders from Pune to join BJP tomorrow : महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर सर्वच पक्षांनी आपल्या अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करण्यासाठी काऊंटडाऊन सुरू केला आहे. यातही पुणे(Pune) आणि पिंपरी-चिंचवड(Pimpari Chinchwad) या दोन महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये मैत्रीपूर्ण लढत होत असल्याने मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. निवडून येण्याच्या निकषावर अनेकांनी भाजपला पहिली पसंती दिली तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला(NCP) दुसरा पर्याय म्हणून पसंती दिल्याच पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील काही भाजप प्रवेश उद्या मुंबईत होणार आहे. प्रवेश करणाऱ्यांची संख्या 22 असल्याचं बोललं जात आहे यापैकी काही जणांचा पक्षप्रवेश जवळपास निश्चित मानला जात असून यापैकी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक राहुल कलाटे, राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार बापू पठारेंचे पुत्र सुरेंद्र पठारे, काँग्रेसचे माजी नगरसेवक आबा बागुल यांचे पुत्र हेमंत बागुल, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगरसेविका रोहिणी चिकटे आदींसह एकूण 22 जणांचा उद्या मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असल्याच जवळपास निश्चित झालं आहे.
दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या इच्छुकांची संख्या मोठी होती मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून विरोध असल्याने काहींना प्रवेश मिळाला नाही. यामध्ये पुण्यातील एका आमदाराच्या मुलाचाही समावेश आहे.
यांच्या प्रवेशाची होतेय जोरदार चर्चा
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नावांपैकी सर्वाधिक चर्चा होणाऱ्या नावामध्ये राष्ट्रवादीचे वडगावशेरीचे आमदार बापू पठारे, यांचे पुत्र सुरेंद्र पठारे, पिंपरी चिंचवडमधून भाजप विरोधात रान उठवणारे आणि शंकर जगताप यांच्या विरोधात विधानसभा लढवलेले राहुल कलाटे हे भाजपवासी होणार आहेत. दरम्यान, या प्रवेशामुळे वडगाव शेरी, पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. एकमेकांवर राजकीय कुरघोड्या आणि शाब्दिक हल्लाबोल करणारे नेते एकमेकांची स्तुती आणि मांडीला मांडी लावून बसलेले पाहायला मिळणार आहे. त्यामुळे विरोधकांवर टीका तर होणारच मात्र अंतर्गत राजकारण देखील पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, जगताप कुटुंबियांच्या विरोधात चिंचवड विधानसभेतून तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवलेले राहुल कलाटे शंकर जगताप यांच्यासोबत कसं जुळवून घेतात तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार बापू पठारे हे राष्ट्रवादीचे आमदार असताना आपल्या मुलाच्या प्रचारात उतरणार का? हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, या प्रवेशाव्यतिरिक्त उद्या इतर कुठले प्रवेश होणार यासाठी उद्यापर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
