अभिजित बिचुकले यांचा कसब्यातून उमेदवारी अर्ज दाखल, पत्रकाराच्या प्रश्नावर बिचुकले संतापले
पुणे: कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या (Kasba Peth Assembly Constituency) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. यासाठी २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. कसब्यात उमेदवारी देताना भाजपला मोठी कसरत करावी लागली. अखेर उमेदवारीची माळ माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्या गळ्यात पडली. पण आता टिळकांच्या घरात उमेदवारी न देता भाजपने घराबाहेरील उमेदवार दिल्याने मोठी नाराजी उफाळल्याचे चित्र आहे. अशा अनेक राजकीय घडामोडींमुळे लक्षवेधी ठरत असलेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक आता आणखी रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. कारण या कसबा पोटनिवडणुकीच्या रिंगणात आता बिग बॉस फेम अभिजित बिचुकले (Abhijit Bichakule) यांनी उडी घेतली आहे. अभिजित बिचुकले यांनी आज कसब्यातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
काही दिवसांपूर्वीच बिचुकले यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले यांनी कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विकत घेतला होता. त्यानंतर आज अभिजित बिचुकले यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात जाऊन रितसर उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, जोपर्यंत मी विधानभवनात किंवा संसदेत जात नाही, तोपर्यंत निवडणूक लढणं हे मला भाग आहे. मी दोन वर्षांपासून कसबा पेठेत राहतोय. मग या लोकांचे प्रश्न माझे नाहीत का? मध्यंतरी ‘कसबा भकास झाला’ असे काही बॅनर्स लागले होते. त्याच भकास झालेल्या कसब्याला सजवायला मी येत आहे, असे अभिजित बिचुकले यांनी सांगितले.
यावेळी पत्रकाराने विचारलं की, काही दिवसांपूर्वी तुम्हाला प्रश्न विचारण्यात आला होता की, कसबा पेठ विधानसभा मतदार संघातून तुम्ही निवडणूक लढणार का, असं विचारण्यात आलं होतं. त्यावेळी तुम्ही मृत व्यक्तीच्या जागी मी निवडणूक लढवणार नाही, असं म्हणाला होता. पत्रकाराच्या या वक्तव्यावर बिचकुले चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं. मी असं म्हणालोच नव्हतो, हे चुकीचे प्रश्न विचारु नका. तुम्ही पैसे घेऊन मला प्रश्व विचारत आहात का? असा आक्रमक पवित्रा बिचकुले यांनी घेतला. त्यावेळी उपस्थित पत्रकार आणि बिचुकले यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली.
दरम्यान, भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांच्यासारखे तगडे उमेदवार समोर असताना अभिजित बिचुकले कोणत्या मुद्द्यावर कसब्यातील मतदारांना साद घालणार, हे पाहावे लागेल.