दिवेघाटात 23 वर्षीय तरुणाचे अपहरण करून जीव घेण्याचा प्रयत्न; लोकेशन ट्रेस करत पोलिसांनी आरोपींना पकडले

पत्नीशी मोबाईलवर चॅटिंग करत असल्याच्या संशयातून एका 23 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न.

  • Written By: Published:
Untitled Design 64

Attempt to kidnap and kill a young man : पुणे जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक अपहरण प्रकरण समोर आले आहे. पत्नीशी मोबाईलवर चॅटिंग करत असल्याच्या संशयातून एका 23 वर्षीय तरुणाचे अपहरण करून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि तांत्रिक तपासामुळे अपहरणकर्त्याचा हा कट अयशस्वी ठरला.

ऋषिकेश विजय चांदगुडे असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव असून, याप्रकरणी ओंकार प्रकाश भोसले आणि तन्मय सुधीर साळुंखे या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर या कटात सहभागी असल्याच्या संशयावरून एका महिलेला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी आरोपींनी ऋषिकेशला सुपा-मोरगाव मार्गावरील चतुर्थी हॉटेल परिसरात बोलावून घेतले. सुरुवातीला साधी भेट असल्याचा भास निर्माण करण्यात आला. मात्र फॉरेस्ट गेट परिसरात पोहोचताच आरोपींनी पिस्तूल आणि चाकूचा धाक दाखवत ऋषिकेशला जबरदस्तीने स्विफ्ट कारमध्ये बसवले.

यानंतर आरोपींनी त्याला पुण्याच्या दिशेने घेऊन जात असताना त्याच्यावर चाकूने हल्ला करण्याचा देखील प्रयत्न केला. स्वतःचा बचाव करताना चाकूचा वार त्याच्या डाव्या भुवईजवळ लागल्याने तो जखमी झाला. त्यानंतर दिवेघाटाच्या पायथ्याशी नेऊन आरोपींनी त्याला बेदम काढणं केल्याचे देखील समोर आले आहे.
मात्र जीवाच्या आकांताने झुंज देत ऋषिकेशने अंधाराचा फायदा घेत आरोपींच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर मित्रांच्या मदतीने त्याने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला आणि संपूर्ण प्रकाराची माहिती दिली.

नमाज पठण नाही केले तर कुटुंब नरकात जाईल; चार्जशीटमधील आरोपांमुळे नाशिक TCS प्रकरण पुन्हा चर्चेत

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक नवसरे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक सक्रिय झाले. जेजुरी, सासवड, उरुळीकांचन आणि यवत परिसरातील पोलिसांना तातडीने नाकाबंदीचे आदेश देण्यात आले. दरम्यान, मोबाईल कॉल आणि लोकेशन ट्रॅकिंगच्या मदतीने आरोपींचा माग काढण्यात आला. तांत्रिक तपासातून आरोपींचे लोकेशन दिवेघाट परिसरात असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी शोधमोहीम अधिक तीव्र केली. अखेर सासवड पोलिसांच्या मदतीने झेंडेवाडी परिसरात संशयितांची स्विफ्ट कार अडवण्यात आली आणि आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले.

या संपूर्ण प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, केवळ संशयातून एका तरुणाचे अपहरण करून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. सुपा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, न्यायालयाने दोन्ही आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी करत आहेत. पत्नीशी चॅटिंगचा संशय, पिस्तूल-चाकूचा धाक, अपहरण, मारहाण आणि दिवेघाटातील थरारक सुटका… या संपूर्ण घटनेने पुणे जिल्हा हादरला आहे.

follow us