Nana Patole : ‘काँग्रेसचा उमेदवार आज रात्री जाहीर होईल’
पुणे : आजारी असतानाही मुक्ता टिळक (Mukta Tilak)यांनी पक्षासाठी काम केलं. त्यामुळं त्यांच्याच घरातील पक्षाला तिकीट मिळेल असं वाटलं होतं, पण तसं झालं नाही. आम्ही आमच्या उमेदवाराचा अर्ज उद्या भरणार असल्याचं काँग्रेसचे (Congress)प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सांगितलंय. कसबा पेठ (Kasba)आणि चिंचवड (Chinchwad) या दोन्ही जागेबाबत महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi)चर्चा झालीय. त्यानुसार कसबा पेठ विधानसभेचा आज रात्री काँग्रेसचा उमेदवार जाहीर होईल. तर, चिंचवडच्या जागेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)मधील नेते भूमिका मांडतील, अशी माहिती काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
काँग्रेस पक्षाच्या वतीनं उद्या देशभरात मोठे आंदोलन केलं जाणार असल्याचंही यावेळी पटोले यांनी सांगितलं. पुण्यात होणाऱ्या आंदोलनामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde)उपस्थित राहणार आहेत. यावेळी पटोले म्हणाले की, सर्वसामान्य लोकांचा बँकेत ठेवलेला पैसा सुरक्षित राहिला नाही. सरकार याविषयी काहीच बोलत नाही. त्यामुळं जनतेची लढाई आम्ही रस्त्यावर करणार आहोत, असेही पटोले यावेळी म्हणाले.
यावेळी पटोले म्हणाले की, उद्या देशभरात आंदोलन होणार आहे. उद्या सकाळी कसबा गणपतीची आरती करून काँग्रेसचे उमेदवार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघणार असल्याचेही सांगितले. काँग्रेसचा उमेदवार आज संध्याकाळपर्यंत ठरणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
भाजपनं टिळक परिवाराला तिकीट न दिल्यामुळं निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रश्नच येत नसल्याचंही यावेळी पटोले म्हणाले. पत्रकारांच्या प्रश्नावर पटोले म्हणाले की, वंचितचा आमच्याकडं किंवा आमचा वंचितला कोणताही प्रस्ताव नाही. त्यामुळं यावर चर्चा करणं योग्य नाही, असंही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं.