धंंगेकरांचा भाजपला इशारा.. म्हणाले, राहुल गांधींवरील कारवाई म्हणजे लोकशाहीची..
Congress : काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यावर झालेली कारवाई अत्यंत चुकीची आहे. एकप्रकारे ही लोकशाहीची हत्याच आहे. या कारवाईविरोधात आम्ही पुण्यात ठिकठिकाणी आंदोलने केली. आता पुढे काय करायचे याचा निर्णय लवकरच घेणार आहोत. पुन्हा रस्त्यावर उतरून आंदोलनही करू, असा इशारा कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी दिला.
शहरातील लोकमान्य टिळक सभागृहत आज महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी धंगेकर यांनी भाजपाच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला.
हे वाचा : राहुल गांधींवरील कारवाईनंतर काँग्रेस आक्रमक; ‘डरो मत’ देशव्यापी आंदोलनाची घोषणा
ते म्हणाले, की राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचा कोणताही अपमान केलेला नाही. भाजपाकडून हा चुकीचा प्रचार केला जात आहे. भाजपने सध्या हिंदुत्व, ओबीसी यांच्यासह सगळ्यांचीच मक्तेदारी घेतली आहे. त्यांच्याकडून सध्या चुकीचा प्रचार केला जात आहे. गोबेल्स नितीचा वापर केला जात आहे. पण शेवटी वाईटाचा अंत हा वाईटच असतो. हिटलरला सुद्धा आत्महत्या करावी लागली होती अशा शब्दांत त्यांनी केंद्र सरकारला इशारा दिला.
ते पुढे म्हणाले, लोकशाही पद्धतीने वागणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. भाजपनेही संविधानाप्रमाणे काम करावे. राहुल गांधींवर कारवाई म्हणजे एकप्रकारे देशात संविधान धोक्यातच आले आहे. लोकशाहीत असे चालत नाही. त्यांचे सात वर्षांचे शासन हे लोकशाहीची हत्या करणारेच असल्याचा आरोप धंगेकर यांनी केला.
राहुल गांधी प्रकरणाचे विधानसभेत पडसाद: महाविकास आघाडीचा बहिष्कार
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेस सोमवारपासून देशभरात आंदोलन करणार आहे. तर दुसरीकडे भाजपने देखील या विरोधात रणनिती आखली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.